Thursday, May 24, 2018

Danshkaal (दंशकाल)Danshkaal by Rushikesh Gupte
My rating: 5 of 5 stars

दंशकाल वाचून दोन दिवस झाले. अजूनही त्यातली माणसं डोक्यातून गेलेली नाहीत. फार दिवसांनी मानसिकदृष्ट्या इतकी थकवणारी कादंबरी वाचली. माणसाच्या मनाची गुंतागुंत, लालसा, वासना, घराण्याचे पोकळ डोलारे, कोकणाची गूढ पार्श्वभूमी हे सगळं झपाटून टाकणारं आहे. भय आणि मैथुन ह्या आदिम प्रेरणांचा लेखकानं फार उत्तम पद्धतीनं मागोवा घेतला आहे असं वाटलं.

प्रश्न पाडूनच न घेणारा किंवा पडलेल्या प्रश्नांची सोपी उत्तरं शोधणारा, सतत भित्रेपणाची कवचकुंडलं बाळगणारा नानू ओळखीचा वाटत राहतो. नंदाकाकासारख्या रासवट माणसाला, आजीसारख्या राजकारणी बाईला, काकूसारख्या मिटून गेलेल्या बाईला जसा घराण्याचा अभिमान आहे तसा तो भित्र्या नानूलाही आहेच. त्यानं कितीही नाकारला तरी. तो किती पोकळ आहे हे सतत जाणवत राहतं. माझ्यासारख्या तद्दन शहरी बाईला तर असा अभिमान म्हणजे एक कोडंच वाटतं. पण इथल्या सगळ्या पात्रांच्या वागण्यामागे त्या अभिमानाची प्रेरणा दिसून येते आणि ती जराही खोटी वाटत नाही.

आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कथेतल्या स्त्री व्यक्तिरेखा. आजी, काकू, बाई, अनू या सगळ्याच व्यक्तिरेखा खूप सशक्त आणि ताकदीच्या झाल्या आहेत. घरातलं जेन्डर पॉलिटीक्स उलगडवून दाखवत या चौघीजणी भुरळ पडतात.
लेखकाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा ! आम्हाला आणखी असंच ताकदीचं आणि सकस लिखाण वाचायला मिळो.


View all my reviews

Monday, January 16, 2017

काही ओळी

१. निळंशार संथ पाणी
सारं काही सामावून घेणारं ...
त्यात सचैल न्हाऊन आता युगं लोटली आहेत

मी पुन्हा एकदा कोरडीच 
नवीन मन्वंतराची वाट पाहत !

२. भवताली जितकी माणसं तितके त्यांचे शब्द
तितकाच  गडद होत जाणारा कल्लोळही ....
कंठाशी येत असणारं काही नकळत दडपू पाहणारा 

त्यातून वाट काढत तळातून शब्द बाहेर येतात
तेव्हाच झालेलं असतं  खरं शांतवन !

Thursday, June 18, 2015

गमावलेल्या संधीची किंमत

मागच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तक्षशीलाच्या ब्लॉगवरील आणखी एका लेखाचा मराठी अनुवाद केला आहे. जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

मूळ लेख - कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है 

अनुवाद - गमावलेल्या संधीची किंमत

व्यवहाराची किंमत

मागच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे तक्षशीलाच्या ब्लॉगवरील आणखी एका लेखाचा मराठी अनुवाद केला आहे. जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा.

मूळ लेख - फायदा अठन्नी का और खर्चा एक रुपये का

अनुवाद - व्यवहाराची किंमत

Monday, April 06, 2015

वादे वादे जायते तत्त्वबोध:


सरकारच्या कामकाजावर आणि धोरणांवर टीका करणे किंवा आपल्या आवडीचे सरकार आहे म्हणून त्याच्या सर्व निर्णयांचे सरसकट कौतुक करत सुटणे फारच सोपे आहे. पण खरोखरच ही धोरणे काय आहेत? त्याची कारणे काय? परिणाम कोणते? अमुक एका धोरणातून देशाचा विकास साधला जाईल का? असा अभ्यास करून कोणताही निर्णय आणि चर्चा समजून घेणे हे जबाबदार नागरिकाचे लक्षण आहे.

देशातील विविध प्रांतातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणून अशाप्रकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील धोरणांचा अभ्यास करावा यासाठी चेन्नई आणि बंगलोर येथील काही जणांनी मिळून तक्षशीला ही  कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसलेली , non -profit आणि स्वायत्त अशी संस्था सुरू केली. अर्थशास्त्र, शिक्षण, परराष्ट्र धोरण इत्यादी विषयातील मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करणे, लेख लिहिणे, ते लेख जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचावेत यासाठी प्रयत्न करणे, एकूणच समाजात वैचारिक सहिष्णुता रुजावी यासाठी प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे उद्देश. तसेच सरकारी संस्था आणि एनजीओ यांना धोरणे ठरविण्यासाठी सल्लागार म्हणून देखील तक्षशीला काम करते.

विविध विषयांवरील लेख त्यांच्या ब्लॉगवर नियमित प्रकाशित होत असतात. त्यातील प्रणय कोटस्थाने यांनी लिहिलेल्या चाहतें बेशुमार, संसाधनों का तंग हाल ह्या लेखाचा मराठीत अनुवाद करायची संधी मला मिळाली. कोणत्याही वस्तूची किंमत कशी ठरते ? ह्या अत्यंत मूळ प्रश्नावर यात टिप्पणी आहे. जास्तीत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये अशा मूलभूत विषयांवरील माहिती लिहिली जाऊन ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी यासाठी ह्या ब्लॉगवर इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, कन्नड , मराठी अशा भाषांमध्येही लेख प्रकाशित केले जातात. मराठीत भाषांतर करताना मजा तर आलीच शिवाय अर्थशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नसलेल्या मला एक महत्त्वाची संकल्पना समजली. मराठीतील अनुवाद - वाढता हव्यास आणि संसाधनांचा तुटवडा


Tuesday, February 18, 2014

पांथस्थ

कोणत्याशा एका काळात कुठल्याश्या एका दिवशी त्या ओसाड माळरानावर एका माणसाची आकृती येताना दिसू लागली. आता ही घटना नवलाची असूही शकेल पण नवल करायला लांब लांबपर्यंत तिथे होतंच कोण? त्याच्या आधी इथे कोणी आलं होतं का, आलं असेल तर कशासाठी आणि इथून पुढे कोणत्या रस्त्याने गेलं ह्याची मोजदाद वरचं निळंभोर आकाश नाहीतर खाली पसरलेली वैराण जमीन ह्यांनी केली असेल तरच ! नाही म्हणायला त्या सगळ्या रखरखाटात कसं कोण जाणे पण एक बारीकसं झाड मात्र तग धरून होतं. त्या झाडाला लागूनच एक अगदी लहानशी देऊळवजा झोपडीदेखील होती. त्याच्या आत कधी कोणी डोकावलं होतं का आणि असेल तर त्याचं पुढे काय झालं हे कळायला मात्र काही मार्ग नाही.


हा येणारा माणूस मात्र काही विशिष्ट उद्देशाने तिथे आला असावा. अनेक दिवसांचा प्रवास केल्यानंतर आलेला थकवा त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता. पण ते एकुलतं झाड दृष्टीपथात आलं तसा त्याचा चालण्याचा वेग आपसूकच वाढला. त्या झोपडीपर्यंतचं शेवटचं अंतर तर त्याने जवळ जवळ पळतच पूर्ण केलं. काही शोधत असल्यासारखा त्याने त्या झाडाभोवती आणि झोपडीच्या आसपास तीन चार प्रदक्षिणा घातल्या. शेवटी काहीसा निराश होऊनच तो आत शिरला. बरोबर मध्यभागी असलेला एक दगडी चौथरा, त्याच्यावर एक देवाची मूर्ती आणि कमालीची स्वच्छता वगळता झोपडीत काहीही नव्हतं. तहानलेला, भुकेजलेला आणि दमलेला असा तो तिथेच एका भिंतीला टेकून बसला. बाहेरून क्वचित येणारी हलकी झुळूक आणि नीरव शांतता यामुळे लवकरच त्याला झोप लागली.


बहुधा बराच वेळ गेला. निदान जाग येताना तरी त्याला तसंच वाटलं. दूरवरून येतो आहेसा वाटणारा ततकार जसं आजूबाजूचं भान आलं तसा अगदी जवळच आणि स्पष्ट ऐकू येऊ लागला. उठून बसत डोळे नीट उघडून बघितलं तर त्याला एक वेगळंच दृश्य दिसलं. देवाच्या मूर्तीसमोर एक स्त्री नृत्य करण्यात मग्न होती. अत्यंत साधा वेष आणि समाधानी चेहेरा. ही कोण आणि इथे का आली आहे असे प्रश्न खरंतर त्याला पडलेच होते. पण तिचं त्याच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. ती आपल्याच नादात होती . ती समाधी त्याच्याने मोडवेना आणि तिथून नजरही हटेना. काहीतरी मंत्रमुग्ध करणारं त्या नृत्यात होतं खास ! तालात पडणारी पावलं आणि एका लयीत हलणारं शरीर …मनातली भक्ती चेहेऱ्यावर उमटत होती आणि देहातून पाझरत होती. जणू ती तिच्या नृत्यातून एकाग्रपणे देवाची पूजा करीत होती.


बघता बघता अचानक त्याचा चेहेरा उजळला. कितीक दिवस जे शोधत वणवण फिरत होता ते एकदम गवसल्यासारखं झालं. तुकड्या-तुकड्यांनी जगायचा कंटाळा आला म्हणून आपण बाहेर पडलो. हे असंच एकसंध काहीतरी हवंय आपल्याला. हिच्याकडेच तो मार्ग मिळेल. खात्रीच पटली त्याची. हरप्रकारे तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न त्याने सुरू केला. पण ती जशी काही नव्हतीच या जगात. त्याची सगळी शक्ती तिच्याशी बोलून उत्तर मिळवण्यासाठी एकवटली. पण तिची एक नजरही त्याच्याकडे गेली नाही. शेवटी थकून आपले हातवारे थांबवत असतानाच काही एक उमगत गेलं मग त्याला. दमून तो झोपडीबाहेर आला तेव्हा त्याचा निश्चय झाला होता.


पुढे… पुढे काय ? पुढे तो आपल्या वाटेने निघून गेला. ते ओसाड माळरान अजून तसंच आहे. अशाच एखाद्या चुकल्या पांथस्थाची वाट बघत !

Saturday, May 04, 2013

कैवल्याच्या चांदण्याला..

आज, उद्या, परवा, महिने, वर्षं अशीच निघून जातात. आपल्याच इच्छा, स्वप्नं, अपेक्षा, आपली असलेली आणि नसलेली माणसं सगळ्यांनी भोवती फेर धरलेला असतो. आपणही त्यांच्या तालात ताल मिळवू बघतो. कधी हे स्वप्न पकड, कधी त्या इच्छेकडे धाव घे, कधी कोणाला चुचकारून बघ. फिरता फिरता लक्षात येतं, जमीन तर कधीच सुटली. आता पाय ठेवायला इथे कुठेच काही नाही.जीव कासावीस होतो. कशाचा आधार शोधायचा तेच कळेनासं होतं. सगळा निरर्थकाचा भोवरा. खोल खोल जावं तसं अजून अजून रिकामी होत जाणारी ओंजळ . का, कशासाठी, कोणासाठी, कुठवर हे कधीच न सुटलेले प्रश्न.


क्वचित कधी पाय जमिनीवर टेकतात.स्वतःचीच पाळंमुळं तपासून बघू लागतात. मातीत हात घालून तण काढताना, अप्रतिम मराठीतली एखादी जबरदस्त कविता ऐकताना, मन लावून नाटक करताना, स्वतःला वाटतं ते हे असं तोडक्या मोडक्या, तुटपुंज्या शब्दात बसविताना, आपल्या असण्याचाच भाग असलेलं काहीतरी अनुभवताना. मुळाशी पोचल्याचा, आपल्याच गाभ्याला स्पर्श करून येण्याचा तेवढा क्षण काय तो खरा. तो क्षण संपल्यावर येणारा रितेपणाही खरा. बाकी सगळा नुसताच गलबला.

Wednesday, March 27, 2013

भाषासु मुख्या मधुरा - २

ह्या संस्कृतवर्गाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत बोलण्यावर बराच भर दिलेला होता. आता संस्कृत भाषा बोलायला शिकायची काय गरज ? असा प्रश्न पडू शकतो किंवा बापरे, संस्कृत बोलायचं, केवढं अवघड आहे ते!! असंही वाटू शकतं. ह्याचं माझ्यापुरतं तरी उत्तर असं आहे - कोणतीही भाषा शिकताना जर आपल्या रोजच्या सवयीच्या गोष्टी त्या भाषेत मांडता आल्या , व्यक्त करता आल्या तर ती भाषा वापरता येण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि ती जास्त जवळची वाटते. शिवाय साधी, सरळ आणि नेहमीची वाक्ये बोलून सुरुवात केली तर ते तितकं अवघडही वाटत नाही. ह्यासाठी आधी काही रोजच्या वापरातल्या वस्तूंसाठी असणाऱ्या शब्दांची आणि काही सर्वनामांची (pronoun) आम्हाला ओळख करून दिली. नंतर त्याचा उपयोग करून छोटी वाक्ये बनवायला सांगितली. सुरुवातीला फक्त हे शब्द आणि त्यापुढे एकच क्रियापद (अस्ति - is ) वापरून वाक्य बनविता आल्यानंतर हळूहळू अजून क्रियापदं, अजून वेगवेगळे शब्द, सर्वनामं, व्यवसाय, नातेसंबंध, आकडे, वेळ, वार, भूतकाळ, भविष्यकाळ अशी त्यात भर घालत गेलो. "लहान सुटसुटीत वाक्यं बनवायची" या एकाच नियमामुळे कितीतरी वाक्यं विचारातला आणि भाषेतला क्लिष्टपणा टाळून बनवता आली.

गोष्ट लिहिणे आणि सांगणे हा वर्गातला गटामध्ये करायचा एक उपक्रम  होता. एखादी चित्रमालिका देउन किंवा साधारण रूपरेषा देउन त्यावर संस्कृतमध्ये गोष्ट लिहायची. गोष्ट आपली नेहेमीचीच, तहानलेला कावळा किंवा तत्सम. सुरुवातीला अर्थातच आधी इंग्लिशमध्ये वाक्य ठरवणे आणि मग संस्कृतातल्या माहित असलेल्या थोड्याफार शब्दासंग्रहामध्ये ते वाक्य बसवणे अशी कसरत करता करता पानभर गोष्ट बनवल्यावर एकदम भारी वाटलं. शिवाय स्वतः संपददा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही उत्तम बडबडगीते रचली आहेत. कोणतीही भाषा शिकताना त्यातल्या गोष्टी आणि अशी गाणी फारच उपयोगी पडतात. गोष्टींमुळे  बोलीभाषेचा चांगला परिचय होतो तर गाण्यांमुळे भाषेची लय कळते आणि ती तोंडातही बसते. संस्कृतला मुळातच एक लय असल्याने ही बडबडगीते ऐकायला आणि म्हणायला अजूनच गोड वाटतात. संपददांनी रचलेलं हे एक गाणं : 
                           एषः वृक्षः विशालवृक्षः 
                            वृक्षे  नीडः अतिलघुनीडः |
                            नीडे पक्षी  पीतः पक्षी 
                            करोति  गानं  चिचिचि  चिचिचि  चिचिचि  चिचिचि  ||

सुसूत्र आणि सुसंबद्ध व्याकरण ही संस्कृतची खासियत. पाणिनी, पतंजली आणि कात्यायन हे तिघे आद्य व्याकरणकार.  पाणिनीने लिहिलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ संपूर्ण संस्कृत व्याकरणाचा पाया आहे. यात जवळजवळ चार हजार सूत्रांमध्ये व्याकरण विवेचन केले आहे. जाता जाता सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ श्लोकरूपात किंवा पद्यरूपात आहे. संस्कृतमध्ये बोलायची थोडीफार सवय झाल्यानंतर आम्हाला अगदी मूलभूत आणि गरजेपुरतं व्याकरण शिकवलं.
                           यद्यपि बहु नाधिषे
                           तथापि पठ पुत्र व्याकरणम् ।
                           स्वजनः श्वजनो मा भूत ,
                           सकलं शकलं, सकृत शकृत ॥

(हे मुला, जरी खूप शिकला नाहीस तरी थोडंसं व्याकरण जरूर शीक. जेणेकरून स्वजन (नातेवाईक) ऐवजी श्वजन (कुत्रा) , सकल (सर्व) ऐवजी शकल (तुकडे) आणि सकृत (एकावेळेस) ऐवजी शकृत ( विष्ठा) करणार (लिहिणार / बोलणार) नाहीस.)

कोणतेही संस्कृत लिखाण वाचायचे असेल तर संधी समजून घेणे आवश्यक आहे. सम् (एकत्र) + धा (जोडणे) ह्यापासून संधी  हा शब्द तयार झाला. दोन शब्द एकापुढे एक आल्यावर त्यांच्यात थोडेफार बदल होऊन उच्चारायला अधिक नैसर्गिक आणि प्रवाही असा तिसरा शब्द बनतो. उदा - भगवत् + गीता हे शब्द एकत्र येताना  "त्" ह्या कठोर दन्त्य ( dental ) व्यंजनानंतर "ग" हे मृदू व्यंजन येत असल्याने "त" चे रुपांतर त्याच गटातील "द" ह्या मृदू व्यंजनात होते आणि भगवद्गीता हा शब्द तयार होतो. किंवा "सूर्य उदय" असे दोन शब्द वेगळे उच्चारले तर बोलताना मध्येच अडथळा आल्यासारखे वाटते. पण त्याऐवजी सूर्य मधला "अ" आणि उदय मधला "उ" एकत्र करून त्याचा "ओ" झाला की सूर्योदय हा शब्द उच्चारायला आणि ऐकायला सहज वाटतो. अशा तऱ्हेने तयार झालेल्या प्रवाही शब्दांमुळे संस्कृत बोलायला आणि ऐकायला अतिशय लयबद्ध आहे.

ज्यांनी ही कार्यशाळा घेतली ते SAFIC चे director डॉ. संपदानंद मिश्र यांच्या कामाबद्दल इथे थोडं सांगितलंच पाहिजे. संस्कृत संबंधित विविध संशोधन प्रकल्पांवर SAFIC मध्ये काम चालते.  ह्या प्रकल्पाचाच भाग म्हणून त्यांनी भगवद्गीतेवर एक मल्टिमिडीया सीडी बनविलेली आहे. त्यामध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक, त्याचा अर्थ, त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ, श्लोकाच्या छंदाचे विवेचन, तो श्लोक योग्य उच्चारांसह कसा म्हणायचा याचे प्रात्यक्षिक अशा सर्व गोष्टी आहेत. याखेरीज वेद, उपनिषदे यावरही अशा पद्धतीचे प्रकल्प चालू आहेत. त्याबरोबरच संस्कृतचा प्रसार करणे आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी संस्कृत हे एक माध्यम म्हणून अंगीकारणे हे त्यांचे उद्देश आहेत. त्यादृष्टीने हे वर्ग घेतले जातात. या कार्यशाळेसाठी अक्षरशः देशभरातून आणि परदेशातूनही लोक आले होते. प्रत्येकाचा यायचा उद्देश वेगळा होता. कोणी भाषेची आवड म्हणून , कोणी त्यांच्या भाषिक अभ्यासाचा एक भाग म्हणून, कोणी उत्सुकता म्हणून तर काही लोक त्यांच्या अध्यात्मिक साधनेचा एक भाग म्हणून तिथे आले होते. पण आम्हाला प्रत्येकालाच त्यातून काही ना काही मिळालं हे खरं .

Thursday, March 14, 2013

भाषासु मुख्या मधुरा - १

 श्री ऑरोबिंदो सोसायटीच्या Sri Aurobindo Foundation for Indian Culture (SAFIC) ह्या विभागाने पॉन्डीचेरी येथे सहा दिवसांची संस्कृत कार्यशाळा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केली होती. केवळ संस्कृतची आवड आणि नवीन ठिकाणी जायची उत्सुकता एवढ्या दोन गोष्टी मला तिकडे जायला पुरेशा होत्या. SAFIC चे संचालक डॉ . संपदानंद मिश्र यांनी ही कार्यशाळा घेतली. संस्कृतसंदर्भात जे काही तिथे शिकायला मिळालं ते इथे शब्दात मांडून ठेवायला बघतेय. अर्थातच खूप गोष्टी राहून जायची शक्यता आहे. पण तरी …

साधारणपणे आपल्याकडे शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे संस्कृत शिकवतात त्यात भरपूर पाठांतर आणि  क्लिष्ट व्याकरण ह्यावर भर असतो. ह्यापलीकडे जाउन त्या भाषेचा आस्वाद घेणे हा प्रकार तसा कमीच होतो. संस्कृत शिकायची सुरुवात होते ती हमखास - देव, वन, माला असे शब्द चालवून. आता शब्द चालवणे म्हणजे नक्की काय? तो का चालवायचा? हे सुद्धा तेव्हा कळलेलं नसतं. मग पुढे त्यातच भर पडत जाते , परस्मैपदी धातू , आत्मनेपदी धातू, वर्तमानकाळ, भूतकाळ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संधी, समास इत्यादी इत्यादीची. मूळ भाषा, तिचा लहेजा, तिचं सौंदर्य, तिच्यामागचं तर्कशास्त्र हे सगळं कुठेतरी हरवून आपण येड्यासारखे पाठ करीत बसतो आणि मार्क मिळवतो ( स्कोरिंगला संस्कृत बरं पडतं !!!)

संपददांच्या वर्गात ह्या पाठांतराला पूर्ण फाटा दिलेला होता. सुरुवात झाली ती वर्णमालेपासून. वर्णमालेचे दोन मुख्य विभाग - स्वर (vowels) अणि व्यंजने (consonants). स्वयं राजते इति स्वरः  - जे स्वयंप्रकाशी आहेत आणि ज्यांचे अस्तित्व इतर कशावरच अवलंबून नाही  ते स्वर. अनु व्यज्यते इति व्यंजनः  - ज्यांना पूर्णत्व मिळण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते ती व्यंजने.

अक्षर म्हणजे भाषेचा अतिशय  मूलभूत घटक. हा  घटक इतका गृहीत धरलेला असतो की त्यात आपण "असं का? " हा प्रश्न विचारू शकतो असं वाटत नाही.  पण वर्णमालेत अक्षरे एका विशिष्ट क्रमानेच का येतात? व्यंजनांमध्ये पहिला "क" वर्ग (क, ख, ग, घ, ङ् ) का ? त्यानंतर "च" वर्ग (च, छ, ज, झ, ञ ) मग अनुक्रमे "ट " वर्ग (ट, ठ, ड, ढ, ण), "त" वर्ग (त, थ, द, ध, न) आणि "प" वर्ग (प, फ, ब, भ, म ) का येतात? ह्यालादेखील योग्य असे उत्तर आहे. कोणतेही अक्षर उच्चारताना तो आवाज आपल्या तोंडातून ज्या ठिकाणाहून निघतो ते ठिकाण महत्त्वाचे असते. "क" वर्गातील सर्व अक्षरे उच्चारताना जिभेचा स्पर्श तोंडाच्या सर्वात मागच्या भागाला (guttur किंवा कंठ ) होतो.  "च" वर्गातील अक्षरांसाठी जीभ टाळूला (palate) स्पर्श करते. ह्या पद्धतीने आवाजाचे तोंडातील उगमस्थान पुढे पुढे जात "ट" वर्गातील मूर्धन्य (cerebral ) अक्षरे, "त" वर्गातील दन्त्य (dental) आणि "प" वर्गातील ओष्ठ्य (labials) अक्षरे तयार होतात. प्रत्येक वर्गातील पहिले अक्षर (क, च, ट, त, प) ही कठोर व्यंजने असून ती उच्चारताना श्वास रोखला जातो . दुसरे अक्षर (ख, छ, ठ, थ, फ) हे देखील कठोर व्यंजन पण उच्चारताना श्वास तोंडातून बाहेर टाकला जातो. तिसरे अक्षर (ग, ज, ड, द, ब) ही मृदू व्यंजने आणि उच्चारताना श्वास रोखावा लागतो तर चौथे अक्षर (घ, झ, ढ, ध, भ) हे देखील मृदू पण उच्चारताना श्वास तोंडावाटे बाहेर सोडावा लागेल असे आहे. प्रत्येक गटातले पाचवे अक्षर ज्याला अनुनासिक म्हणतात ( ङ्, ञ, ण, न, म) ते मृदू उच्चाराचे पण नाक आणि तोंड या दोन्हीवाटे श्वास बाहेर सोडला जातो असे आहे.

संस्कृतमधील "छंद" (आपल्या मराठीत "वृत्त"/ इंग्लिशमध्ये meter) हा एक स्वतंत्र आणि खूप मोठा विषय आहे. त्याची नुसती तोंडओळख ह्यावेळेस झाली.  "छन्दस्" या शब्दाचा मूळ अर्थ - आनंददायक किंवा सुखदायक. कोणतेही पद्य, काव्य, सुभाषित म्हणताना ते छंदाला अनुसरून असणाऱ्या चालीत म्हटलं तर म्हणताना आणि ऐकताना अतिशय गोड वाटतं. शार्दूलविक्रीडितम् , मन्दाक्रान्ता, भुजंगप्रयातम् (भुजङ्गप्रयातम्) अशी या छंदांची नावं ऐकायला अगम्य वाटली तरी त्यांचा अर्थ समजून घेतला तर प्रत्येक नावामागे काही एक विचार आहे हे लक्षात येतं.

भुजंगप्रयातम् (भुजङ्गप्रयातम्) - ह्या छंदात सापाच्या लयबद्ध हालचाली प्रमाणे शब्दांची समान रचना दिसते.

          न तातो न माता न बन्धुर्न भ्राता
          न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता |
          न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
          गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||

शार्दूलविक्रीडितम्  - वाघ आपले भक्ष्य पकडताना पहिली एक मोठी उडी घेउन मग लहान लहान उड्या मारत भक्ष्यापाशी पोचतो तसंच ह्या छंदात बसवलेले कोणतेही पद्य म्हणताना नैसर्गिकरित्या यति (pause) एकदम १२ व्या अक्षरानंतर येते. (एका ओळीत एकूण १९ अक्षरे असतात) 
          कस्तुरी तिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम्  ।
          नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणु करे कंकणम् ।

प्रत्येक छंदाला जसे विशिष्ट नियम (लक्षणे) आहेत तसाच स्वतःचा असा एक स्वभावही आहे. मन्दाक्रान्ता म्हणजे अतिशय सावकाश हालचाल. कालीदासाचं  "मेघदूत"  हे विरहकाव्य मन्दाक्रान्तामध्ये बांधलेलं आहे. दुःख, विरह इत्यादी भावना व्यक्त करायला हा छंद वापरतात. तसंच इन्द्रवज्रा ( म्हणजे इन्द्राचे शस्त्र (वज्र) ) हा छंद - शौर्यभावना किंवा कोणताही उत्कट भाव प्रभावीपणे दाखवितो.

Friday, October 08, 2010

एट, सेव्हन ,सिक्स ,फाईव्ह ...

आधीच ५ मिनिटं उशीर झाला होता.एरोबिक्स हॉल मधे बाहेरूनच डोकावून बघितलं तर बॅच सुरू झाली होती. ("श्या !! नेमका आजच उशीर झाला तर बॅच वेळेवर सुरू झाली.त्यातून ही ताडमाड उंच instructor जराही उशीर खपवून घेत नाही. जावं का बाहेरच्या बाहेर? खाली जाऊन gym करूया आज. नाहीतर जाऊदे , होईल ते होईल .करू एरोबिक्सच !")

"एट, सेव्हन , सिक्स , फाईव्ह ... latecomers please warm yourself up! we are already warmed up!" ("अरे वा !! आज एवढ्यावरच ?एरवी उशीर झाला तर आत घेत नाही")

"अजून वर घे तो पाय.you are only dancing.त्याचा काही उपयोग नाही ...("dancing???? भारी!! :P ")"

"why are you taking a breather between two steps? it looks like an elephant !do it in one go!" ("कसं शक्य आहे? मधे एक tap घेतला नाही तर पडीन मी......पण elephant??? ....ohh not bad !! जमतंय की थोडं थोडं ...")

"आज मी side bending घेणार आहे सगळं.एकेकाचे मस्त tyre आहेत ते जरा कमी करुया."("हिने रोज येऊन एवढं छळलं तर नक्कीच कमी होतील!")

"वाका जरा सगळे अजून.very good. you are doing it well." ("वा!! हिच्याकडून very good वगैरे ..नक्कीच चांगलं जमतंय!")

"एट, सेव्हन ,सिक्स ,फाईव्ह ,फोर, थ्री ,टू,वन ("हुश्श संपलं !!!") and give me one more set एट, सेवन ,..("अरे देवा!! मारणार आहे आज ही! मगाशीच बाहेरच्या बाहेर कटायला हवं होतं का?" )

"very good batch ..आता squats करूयात , मग थोड़े abs आणि stretches" ("finally!! उड्या मारणं संपलं ..abs, stretches आणि squats ठीक आहे. ते जमतं आणि करताना भारी पण वाटतं")

"now relax for a while. put one side of your face on your palms and close your eyes."

मी पालथ्या हातावर डोकं ठेवून शांतपणे डोळे मिटून घेतले. एवढा सगळा दंगा घालून आता पडल्यावर एकदम निवल्यासारखं वाटत होतं. ते निवलेपण हळू हळू संपूर्ण शरीरात झिरपत जाताना जाणवत होतं. जणू काही माझ्या शरीराचा आणि मनाचा एकमेकांशी संवाद चालू होता.state of complete bliss!!!

आणि त्याच state of bliss मधे मला हे लिहावंसं वाटलं ! :-)

Friday, May 14, 2010

पारतंत्र्य

स्थळ:पाणीपुरीची एक टपरी.
एक सुखवस्तू कुटुंब पाणीपुरी खात होतं. आई-बाबा आणि दोन पाच ते दहा वर्षांची मुलं. बाबा त्या पाणीपुरी विकणाऱ्या माणसाला मध्येच म्हणाले "ए ,ह्यात पाणी घाल रे जरा अजून". वाक्य तसं साधंच पण म्हणायची पद्धत किंवा tone साधा नव्हता. त्यात त्या विकणाऱ्याबद्दलची तुच्छता आणि स्वतःबद्दलचा माज ठासून भरलेला होता.

आपण चांगल्या खात्यापित्या घरातले, कुठेतरी white collar नोकरी नाहीतर व्यवसाय करणारे म्हणून हातगाडीवर काहीतरी विकणाऱ्यापेक्षा किंवा हॉटेल मधल्या वेटरपेक्षा वरचढ आहोत आणि त्यांच्याशी कसंही बोलू शकतो,असं का वाटतं ? साधी गोष्ट आहे,ज्याची आपली ओळख नाही अशा माणसाशी बोलताना आपण अहो-जाहो वापरतो किंवा अरे-तुरे केलं तरी त्यात तुच्छता नसते. हे जर एरवी आपण करू शकतो तर वॉचमन ,हातगाडीवाले, वेटर , मोलकरणी यात अपवाद का? मग आपलं काम केल्याबद्दल त्यांना thank you म्हणणं तर सोडाच. एखादा माणूस योग्य मार्गाने कष्ट करून स्वतःचं पोट भरत असेल तर किमान अपेक्षित असणारा आदर देखील त्याला द्यायचा का नाही हे तो white collar काम करतो का blue collar यावर का ठरतं ?

एकूणच आपण भारतीय लोक शारीरीक श्रमांना फारशी किंमत देत नाही यात काही नवीन नाही. the interesting question is "why" are we like this? मुळात शेतीप्रधान देश, सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेण्याचा इतिहास ,त्याला पूरक अशी प्राचीन समाजव्यवस्था असं सगळं असतानाही ही शारीरीक कष्टांना कमी लेखण्याची वृत्ती आली कोठून? एक शक्यता वाटते...दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केल्यानंतर आणि त्याच्याही आधी वेगवेगळ्या परकीय आक्रमणांचा अनुभव घेतल्यानंतर जो प्रगत तो वरचढ हे तत्त्व आपल्या लक्षात आलंच असणार. त्यांनी जशी आपल्यावर सत्ता गाजवली तशी आपण आपल्याच देशातल्या कमी प्रगत लोकांवर गाजवायची हे इतक्या वर्षांत आलेल्या न्यूनगंडातून रुजलं असावं. मग ज्याच्याकडे जास्त पैसा,शिक्षण,सोयी-सुविधा किंवा हे सगळं आहे तोच प्रगत आणि म्हणून वरचढ. त्यातूनच अशा so called वरचढ लोकांमध्ये आलेली इतरांबद्दलची तुच्छतेची भावना.

एखाद्या राजवटीचे फक्त राजकीयच नव्हे तर समाजाच्या मानसिकतेवर देखील किती खोलवर परिणाम होऊ शकतात.

p.s - discussion with siddhya

Tuesday, April 13, 2010

विहीर

तसं पहायला गेलं तर 'विहीर' या चित्रपटामध्ये नचिकेतचा मृत्यू सोडून रुढार्थाने काहीच घडत नाही.बाकी सगळा चित्रपट नचिकेतचा जवळचा मावसभाऊ समीरवर या मृत्यूचा काय परिणाम होतो याभोवती फिरतो.

नचिकेतच्या अचानक जाण्याने सैरभैर झालेल्या समीरच्या मनात प्रचंड खळबळ माजली आहे.पण त्याच्या आजूबाजूची माणसं, घटना पूर्वीसारख्याच आहेत. बाहेरून तोही शक्य तेवढा भोवतालच्या जगाशी सुसंगत वागायचा प्रयत्न करतोय.पण एकीकडे सतत तो घडलेल्या गोष्टीचा ,नचिकेतच्या आधीच्या बोलण्याचा विचार करतोय, त्याला वेगवेगळे प्रश्न पडतायत.

त्याचं शाळेत जाणं, पोहायला जाणं ,अस्वस्थ होऊन घरातून निघून जाणं... या सगळ्या घटना दाखवताना विविध चौकटींचा,दृश्यांचा वापर होतो.मध्येच एक बाई पाणी भरताना दिसते ,एक माणूस घोड्यावरून जाताना दिसतो , बिल्डिंग मधली भांडणं ... वरवर पहाता या सगळ्या चौकटी किंवा दृश्ये संदर्भहीन आणि एकमेकांशी विसंगत वाटतात. पण त्याचा एकत्रित विचार केला तर सभोवतालच्या routine, एकसुरी वातावरणात राहूनही चाललेली समीरच्या मनातली घालमेल,त्याला बसलेला धक्का या गोष्टी अधोरेखित होतात. त्याची जी आतल्याआत उलथापालथ चालू आहे त्याचं बाहेरच्या कोणालाच काही देणंघेणं नाहीये.त्यांच्या ती लक्षातही येत नाहीये.स्वतः समीर तर या भोवतालच्या जगात असून नसल्यासारखा झालाय.

हे सगळं बघताना बरेच प्रेक्षक कंटाळतात (त्यात मी पण आले).कारण इतका वेळ चित्रपट बघूनही अजून काहीच 'घडत' नाहीये असं वाटतं.पण मुळात पडद्यावर दुसऱ्या कोणाच्यातरी आयुष्यात घडणाऱ्या घटना बघताना त्या केवळ बघूनच समजतात असं नाही तर कधीकधी अनुभवाव्या लागतात. आपल्याला मात्र त्यात काहीतरी निष्कर्ष निघायला हवा असतो.मग तो दिग्दर्शकाने तरी काढून द्यावा किंवा आपल्याला काढायला वाव ठेवावा.विहीर मध्ये नेमकं यातलं काहीच होत नाही.एखादं चित्र असावं तसा हा चित्रपट दिसतो.

कुठल्याही नाटकाच्या ,चित्रपटाच्या किंवा कलाकृतीच्या मागचा अगदी मूळ हेतू हा ती बनवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे किंवा भावनांचे सादरीकरण (presentation) अथवा प्रकटीकरण (expression) हा असतो. जेव्हा कलाकृतीमधून एखादा विचार मांडायचा असतो तेव्हा तो समजणं तेवढं कठीण जात नाही.कारण ते समजून घेणं जाणीवेच्या पातळीवर असतं.तुम्ही समोर घडणारी घटना बघता ,त्यावर विचार करता,तो दिग्दर्शकाच्या म्हणण्याशी पडताळून पहाता. पण जेव्हा एखाद्या भावनेचे बारकावे मांडले जातात तेव्हा ही प्रक्रिया ज़रा वेगळी होते. एकदम संवेदनशील कलाकृती बनवताना ती बनवणारा ज्या मनःस्थितीत असतो किंवा ज्या अनुभवातून गेलेला असतो त्याचा अंदाज बघणाऱ्याला येईलच असं नाही. ते समजून घेणं हे बघणाऱ्याच्या मानसिकतेवर, संवेदनशीलतेवर ,त्याने आजवर अनुभवलेल्या गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणूनच अशा कलाकृतीमधून रुढार्थाने काही 'takeaway' नसला तरी ती नेणिवा समृद्ध करणारा एक अनुभव देऊ शकते.

Monday, April 12, 2010

मोहे तोही लागी कैसे छूटे री

The Japanese Wife बघितला आणि एकदम आठवला तो 'बयो' . तेच निरपेक्ष प्रेम, एकमेकांसाठी जगाच्या अंतापर्यंत वाट बघायची तीच ती तगमग, एकाने दुसऱ्याचा घेतलेला अखंड ध्यास आणि दुर्दैवी अखेर.

एकीकडे उधाणलेला समुद्र आणि जीवघेणं सूफी संगीत तर दुसरीकडे पिसाळलेली 'मातली' नदी आणि वेडावाकडा कोसळणारा पाऊस.

लंडनला गेलेल्या विश्वनाथाचं उत्तर आलं नाही तरीही सतत पाच वर्षे चिकाटीने पत्र पाठवत रहाणारी बयो आणि केवळ पत्रांमधून एकमेकांना भेटलेले आणि लग्न करून सतरा वर्षे पत्रांमधूनच सहजीवन अनुभवलेले स्नेहमोय आणि मियागे.

पाच वर्षे विश्वनाथाच्या उत्तराची वाट पाहिल्यानंतर आणि पैसे साठवल्यानंतर थेट लंडनला जायला निघणारी कोकणातली बयो आणि जपानमधल्या मियागेला कॅन्सर झाला म्हणून तिच्या उपचारासाठी कलकत्त्यातल्या डॉक्टर आणि वैद्य लोकांचे उंबरठे झिजवणारा स्नेहमोय..

"तू कोकणातली मुलगी,लंडनला वगैरे जाण्याचं खूळ कशाला घेऊन बसलीयेस?" असं विचारल्यावर बयो "मग,पाच वर्षे झाली, विश्वनाथाचं काही उत्तर नाही,काय झालंय ,काही अड़चण आहे का,जाऊन बघायला नको?" असं अतिशय सहजतेने उत्तर देते.कुठेही विश्वनाथाने आपल्याला सोडलं तर नाही ना अशी शंका नाही, अविश्वास नाही. इतकं शुद्ध प्रेम बघून खरंतर अस्वस्थ व्हायला होतं. कॅन्सरवर जपानमधे भारतापेक्षा जास्त नीट उपचार होऊ शकतील हे माहीत असूनही ,परवडत नसताना कुठल्यातरी वैद्याने दिलेले काढ़े मियागेला पाठवणारया स्नेहमोयची जातकुळी नि:संदेह प्रेमाचीच .

बयो पाहिला तेव्हा प्रचंड आवडला होता.खूप intense सिनेमा आहे .मी परत नाही बघू शकणार.The Japanese Wife तसा विशेष आवडला नाही. पण कोणताही आव न आणता स्वतःच्या प्रेमावर गाढ़ विश्वास ठेवणारे ,मीपण ,पैसा ,प्रतिष्ठा ,कष्ट यांची पर्वा करण्याच्या पलिकडे गेलेले स्नेहमोय,मियागे आणि बयो यांचं कुठेतरी नातं आहे असं वाटत रहातं.

Thursday, February 04, 2010

आस

मनसोक्त निरूद्देश भटकणं अवघड झालंय आजकाल ,
त्याजुन्या गल्लीतले लोक आता अनोळखी नजरेने पहातात

एकट्याने फिरायची तर परवानगीच नाहीये
कधी गेलंच कुठे एकटं ,
तर त्यांची संशयीत नजर तुमच्या बरोबर नसलेल्या दुसऱ्याला शोधत रहाते
तुमच्या येण्याची कारणं मागत रहातात ,नजरेतून ,वागण्यातून
त्यांच्या अपेक्षेत बसणारी उत्तरं माझ्याकडे नसतातच ,
आणि नसतात त्यांना हवे असलेले प्रश्नही

अजून एक वाट बंद झाली असं मनाशीच म्हणत मी हळूच तिथून निघून येते ,
मात्र अजून न भेटलेल्या वाटेची आस खोलवर तशीच असते.

Friday, July 03, 2009

पाऊस आणि उगाच काहीतरी

सकाळपासून पाऊस लागलाय. काम करताना राहून राहून खिडकीबाहेर लक्ष जातंय. नजर हटत नाही इतका सुंदर पाऊस. घरी आल्यावर तर खिडकीशीच चिकटून बसलेय.भारतातला पाऊस छान असतो पण इथला पाऊस काही वेगळाच आहे. भारतातला पाऊस एकटा येत नाही. तो बरोबर चिखल, राडा, डबकी,वेगवेगळे वास,ट्रॅफिक जॅम ,खूप सारे हॉर्नचे आवाज अणि पावसाळी सहली घेऊन येतो. इथला पाऊस एकटाच येतो. लांबचलांब रिकामा रस्ता अणि त्यावर सावकाश पडणारा पाऊस पाहिलाय कधी? भारतातला पाऊस तुमच्या खोड्या काढतोय असं वाटतं. इथला पाऊस शांतपणे सोबत करतो. एखादा दिवस office ला जायला म्हणून निघावं आणि अशी मस्त हवा बघून मधेच उतरून इथल्या अप्रतिम नागमोडी रस्त्यांवरून ह्या पावसाबरोबर निरुद्देश भटकत रहावं.


खिडकीतून बाहेर बघताना एकदम हलकं हलकं वाटतंय. आत्ता इथे फक्त मी आणि सोबतीला पाऊस , बाकी सगळी व्यवधानं , सगळी नाती, त्यातल्या आशा, अपेक्षा ,चिंता,त्यातले गुंते काहीही माझ्यापर्यंत पोचतंच नाहीये. हा या पावसाच्या सोबतीचा परिणाम का एकटेपणाचा ? दृष्टिआड सृष्टी असली की मन किती विनापाश होऊ शकतं. हजारो मैल दूर असलेल्या जवळच्या माणसानी आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर सोडून देणं जमतंय की आपल्याला. मग एरवी नात्यातल्या अपेक्षा , इच्छा , अपेक्षाभंग असल्या खो-खो मधे का रमतो आपण?

नाती इथल्या पावसासारखी का नसतात?

Friday, April 18, 2008

जाणीव

रात्रीचे किती वाजले होते काय माहीत,अचानक कसल्यातरी धसक्याने मी जागी झाले.जाग येतायेताच मुळी जबरदस्त भीती वाटली.आपण बेंगलोर सारख्या सर्वस्वी अनोळखी शहरात एका मोठ्या फ़्लॅट मधे एका खोलीत एकट्याच आहोत,कशावरुन ही जागा सुरक्षित आहे,खोलीला लागूनच असलेल्या बाल्कनीमधून कोणी एकदम आत घुसलं तर,असे विचार मनात येउन वाटलेली ती भीती होती.

मग हळूहळू एकेक गोष्ट लक्षात यायला लागली.बाल्कनी जाळी लावून बंद केली आहे,ती तोडून आत घुसणं बरंच अवघड आहे.शिवाय बाल्कनीच्या दाराला आपणच आतून कडी लावली आहे.खोलीच्या दाराला latch लावलेलं आहे.आणि आत घुसणं इतकं सहज शक्य नाहीये असं सगळं लक्षात आल्यावर माझं डोकं ताळ्यावर आलं आणि लगेचच मी निर्धास्तपणे झोपूनही गेले.मगाशी वाटलेल्या भीतीचा मागमूसही उरला नाही. या सगळ्या प्रकारात फार तर दोन-चार मिनिटं गेली असतील.पण मला आजही तेव्हा झालेली माझी घालमेल अगदी लख्ख आठवते.

खरंतर विशेष कधी घरापासून लांब न राहिलेली मी, महिनाभर बेंगलोरला एकटीलाच रहायला मिळणार म्हणून खूप excite झाले होते आणि असं स्वतंत्र रहाण्याचा मनापासून आनंदही घेत होते.इतक्या दिवसात कधीही मला कणभरही भीती वाटली नव्हती.या वेळी मात्र मनात कुठेतरी खोल रुतून बसलेली गोष्ट भसकन समोर यावी तसं झालं. तेव्हा कळलं नाही पण आता लक्षात येतंय, एकटं रहाणं तेव्हा खऱ्या अर्थाने समोर आलं. इथे रहाताना माझ्याबाबतीत जे काय घडेल ते फक्त माझ्यामुळेच असेल हे तेव्हा उमजलं.

Saturday, March 15, 2008

भैरवी

तीन वर्ष एका कंपनी मधे काम करून, केलेल्या आणि न केलेल्या कामाबद्दल जरूरीपेक्षा जरा जास्तच कौतुक गाठीशी बांधून मी बाहेर पडते. नवीन ठिकाणी, इथे आपल्याबद्दल कोणतेच चांगले-वाईट पूर्वग्रह नसतील त्यामुळे आपण खरंच किती पाण्यात आहोत ते आपलं आपल्यालाच कळून येईल असं म्हणत join होते.लोकांच्या ओळखी करुन घेणं, कोणाशी बोलायला बरं वाटतंय ते बघणं,एखाद्याच्या नुकत्याच झालेल्या थोड्याफार ओळखीनी त्याच्या group मधे बसल्यावर आपण गेला अर्धा तास जवळपास काहीही बोललो नाहीये हे लक्षात येऊन ओशाळणं आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करणं,मगाशी मॅनेजरशी बोलताना जरा अजून smartly बोलायला हवं होतं का वगैरे विचार करून स्वतःलाच judge करत बसणं, असं सगळं सुरू होतं.
हळूहळू मी नवीन ठिकणी रुळते.कॉफ़ी पीत गच्चीवर एकटंच जाऊन शांत बसायला आवडायला लागतं.जुन्या ऑफ़ीस सारखी आजूबाजूला हिरवीगार झाडं दिसायच्या ऐवजी इथे आटलेली नदी अणि वर घिरट्या घालणारे कावळे दिसणार म्हणून किंचित दुःखी झालेली मी, नदीपलीकडे दिसणारा झाडांचा हिरवागार पट्टा बघून सुखावते.कधीतरी एक दिवस कळतं की जुन्या ऑफ़िसची ती भाड्याची बिल्डिंग आता मालकाला परत करणार आणि ऑफ़ीस शिफ़्ट होणार.ध्यानीमनी नसताना अचानक माझा गळा दाटून येतो.डोळ्यासमोर त्या ऑफ़ीस मधले लोक, तिथले दिवस या सगळ्यांचा एक कोलाज तयार होतो.काहीतरी संपून गेल्यासारखं वाटत रहातं.मग कळतं की खरंतर ते कधीच संपलं होतं.आता फक्त ते लक्षात येतंय.भर उन्हाळ्यातल्या त्या रखरखीत दुपारची उदासी अजूनच जाणवायला लागते.जागेवर येऊन मी दर पाच मिनिटांनी मेल्स चेक करते पण बहिष्कार टाकल्यासारखी एकही मेल येत नाही.कोणीतरी फोन करेल म्हणून वाट बघत रहाते पण तोही वाजत नाही.दिवसभर खिन्न वाटत रहातं.
ऊन थोडं उतरल्यावर मी गच्चीवर येते.दुपारचा रखरखाट जाऊन आता आलेलं हलकंसं आभाळ आणि लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा मंद वास.ह्या उन्हाळ्याचे तरी किती मूड्स असतात.काहीतरी संपल्याची ती जाणीव आता सुखद होते.एक संपून दुसरं काहीतरी नवीन सुरु होणार असं वाटायला लावणारी....

Monday, May 29, 2006

झोंबी

डॉ.आनंद यादव यांचं "झोंबी" वाचलं.एक अतिशय अस्वस्थ करणारी सत्यकथा.त्यांचा स्वतःचा लहानपणापासून ते मॅट्रिक होईपर्यंतचा प्रवास यात आहे आणि तो विलक्षण आहे.कागलसारख्या एका सर्वार्थाने मागासलेल्या खेड्यातलं आयुष्य,घरची अत्यंत गरिबी,प्रत्यक्ष वडिलांचा शिक्षणाला कमालीचा विरोध आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांची स्वतःची शिकण्याची जबरदस्त इच्छा.माझ्यासारख्या कितीतरी लोकांना मॅट्रिक पर्यंतचंच काय पण उच्च शिक्षण सुद्धा अतिशय सहज गोष्ट असते.पण जिथे जगण्याचीच लढाई लढता लढता आयुष्य संपतं अशा वातावरणात शिकण्याची इच्छा बाळगणं आणि ती तेवढ्याच चिकाटीने पूर्ण करणं ही किती कठीण गोष्ट आहे ते "झोंबी" वाचताना कळतं.प्रसंगी रस्त्यावरच्या कचरापेटीत पडलेल्या केळ्यांच्या साली खाऊन आपली भूक भागवणारा हाच "आन्द्या" सातवीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला येतो,मॅट्रिक तर होतोच पण पुढे जाऊन ए‍म.ए.पर्यंत शिकतो.हे सगळं करताना त्याच्या लहानपणाचा मात्र बळी जातो.ज्या वयात डोक्यावर कोणतंही ओझं नसावं त्या वयात त्याने अक्षरशः ऊर फुटेस्तोवर केलेल्या कष्टांचं वर्णन वाचून सुन्न व्हायला होतं.

माझ्यासारख्यांच्या पांढरपेशा आयुष्याच्या कोष्टकात हे जगणं बसतंच नाही.एक पुस्तक वाचून मला ह्या जगण्याची जी कल्पना आली ती कदाचित फार वरवरचीच असेल.पहिल्यापासून अत्यंत सुखासीन आणि सुरक्षित वातावरणात वाढल्यानंतर मला ह्या जगण्याची खोली कळणं तेवढंच कठीणही आहे.पण आपण जगतो त्या ठराविक वर्तुळाच्या बाहेरही एक जग आहे आणि ते फार वेगळं आहे ही जाणीव मात्र नक्कीच झाली.

Wednesday, May 24, 2006

सुरुवात

खरं तर "दिसामाजी काहीतरी" लिहिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे.पण जेव्हा लिहावंस वाटेल तेव्हा लिहिण्याचा विचार मात्र आहे.