Friday, July 03, 2009
पाऊस आणि उगाच काहीतरी
खिडकीतून बाहेर बघताना एकदम हलकं हलकं वाटतंय. आत्ता इथे फक्त मी आणि सोबतीला पाऊस , बाकी सगळी व्यवधानं , सगळी नाती, त्यातल्या आशा, अपेक्षा ,चिंता,त्यातले गुंते काहीही माझ्यापर्यंत पोचतंच नाहीये. हा या पावसाच्या सोबतीचा परिणाम का एकटेपणाचा ? दृष्टिआड सृष्टी असली की मन किती विनापाश होऊ शकतं. हजारो मैल दूर असलेल्या जवळच्या माणसानी आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर सोडून देणं जमतंय की आपल्याला. मग एरवी नात्यातल्या अपेक्षा , इच्छा , अपेक्षाभंग असल्या खो-खो मधे का रमतो आपण?
नाती इथल्या पावसासारखी का नसतात?
Friday, April 18, 2008
जाणीव
मग हळूहळू एकेक गोष्ट लक्षात यायला लागली.बाल्कनी जाळी लावून बंद केली आहे,ती तोडून आत घुसणं बरंच अवघड आहे.शिवाय बाल्कनीच्या दाराला आपणच आतून कडी लावली आहे.खोलीच्या दाराला latch लावलेलं आहे.आणि आत घुसणं इतकं सहज शक्य नाहीये असं सगळं लक्षात आल्यावर माझं डोकं ताळ्यावर आलं आणि लगेचच मी निर्धास्तपणे झोपूनही गेले.मगाशी वाटलेल्या भीतीचा मागमूसही उरला नाही. या सगळ्या प्रकारात फार तर दोन-चार मिनिटं गेली असतील.पण मला आजही तेव्हा झालेली माझी घालमेल अगदी लख्ख आठवते.
खरंतर विशेष कधी घरापासून लांब न राहिलेली मी, महिनाभर बेंगलोरला एकटीलाच रहायला मिळणार म्हणून खूप excite झाले होते आणि असं स्वतंत्र रहाण्याचा मनापासून आनंदही घेत होते.इतक्या दिवसात कधीही मला कणभरही भीती वाटली नव्हती.या वेळी मात्र मनात कुठेतरी खोल रुतून बसलेली गोष्ट भसकन समोर यावी तसं झालं. तेव्हा कळलं नाही पण आता लक्षात येतंय, एकटं रहाणं तेव्हा खऱ्या अर्थाने समोर आलं. इथे रहाताना माझ्याबाबतीत जे काय घडेल ते फक्त माझ्यामुळेच असेल हे तेव्हा उमजलं.
Saturday, March 15, 2008
भैरवी
हळूहळू मी नवीन ठिकणी रुळते.कॉफ़ी पीत गच्चीवर एकटंच जाऊन शांत बसायला आवडायला लागतं.जुन्या ऑफ़ीस सारखी आजूबाजूला हिरवीगार झाडं दिसायच्या ऐवजी इथे आटलेली नदी अणि वर घिरट्या घालणारे कावळे दिसणार म्हणून किंचित दुःखी झालेली मी, नदीपलीकडे दिसणारा झाडांचा हिरवागार पट्टा बघून सुखावते.
कधीतरी एक दिवस कळतं की जुन्या ऑफ़िसची ती भाड्याची बिल्डिंग आता मालकाला परत करणार आणि ऑफ़ीस शिफ़्ट होणार.ध्यानीमनी नसताना अचानक माझा गळा दाटून येतो.डोळ्यासमोर त्या ऑफ़ीस मधले लोक, तिथले दिवस या सगळ्यांचा एक कोलाज तयार होतो.काहीतरी संपून गेल्यासारखं वाटत रहातं.मग कळतं की खरंतर ते कधीच संपलं होतं.आता फक्त ते लक्षात येतंय.भर उन्हाळ्यातल्या त्या रखरखीत दुपारची उदासी अजूनच जाणवायला लागते.जागेवर येऊन मी दर पाच मिनिटांनी मेल्स चेक करते पण बहिष्कार टाकल्यासारखी एकही मेल येत नाही.कोणीतरी फोन करेल म्हणून वाट बघत रहाते पण तोही वाजत नाही.दिवसभर खिन्न वाटत रहातं.
ऊन थोडं उतरल्यावर मी गच्चीवर येते.दुपारचा रखरखाट जाऊन आता आलेलं हलकंसं आभाळ आणि लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे येणारा मातीचा मंद वास.ह्या उन्हाळ्याचे तरी किती मूड्स असतात.काहीतरी संपल्याची ती जाणीव आता सुखद होते.एक संपून दुसरं काहीतरी नवीन सुरु होणार असं वाटायला लावणारी....
Monday, May 29, 2006
झोंबी : एक विलक्षण अनुभव
माझ्यासारख्यांच्या पांढरपेशा आयुष्याच्या कोष्टकात हे जगणं बसतंच नाही.एक पुस्तक वाचून मला ह्या जगण्याची जी कल्पना आली ती कदाचित फार वरवरचीच असेल.पहिल्यापासून अत्यंत सुखासीन आणि सुरक्षित वातावरणात वाढल्यानंतर मला ह्या जगण्याची खोली कळणं तेवढंच कठीणही आहे.पण आपण जगतो त्या ठराविक वर्तुळाच्या बाहेरही एक जग आहे आणि ते फार वेगळं आहे ही जाणीव मात्र नक्कीच झाली.