रात्रीचे किती वाजले होते काय माहीत,अचानक कसल्यातरी धसक्याने मी जागी झाले.जाग येतायेताच मुळी जबरदस्त भीती वाटली.आपण बेंगलोर सारख्या सर्वस्वी अनोळखी शहरात एका मोठ्या फ़्लॅट मधे एका खोलीत एकट्याच आहोत,कशावरुन ही जागा सुरक्षित आहे,खोलीला लागूनच असलेल्या बाल्कनीमधून कोणी एकदम आत घुसलं तर,असे विचार मनात येउन वाटलेली ती भीती होती.
मग हळूहळू एकेक गोष्ट लक्षात यायला लागली.बाल्कनी जाळी लावून बंद केली आहे,ती तोडून आत घुसणं बरंच अवघड आहे.शिवाय बाल्कनीच्या दाराला आपणच आतून कडी लावली आहे.खोलीच्या दाराला latch लावलेलं आहे.आणि आत घुसणं इतकं सहज शक्य नाहीये असं सगळं लक्षात आल्यावर माझं डोकं ताळ्यावर आलं आणि लगेचच मी निर्धास्तपणे झोपूनही गेले.मगाशी वाटलेल्या भीतीचा मागमूसही उरला नाही. या सगळ्या प्रकारात फार तर दोन-चार मिनिटं गेली असतील.पण मला आजही तेव्हा झालेली माझी घालमेल अगदी लख्ख आठवते.
खरंतर विशेष कधी घरापासून लांब न राहिलेली मी, महिनाभर बेंगलोरला एकटीलाच रहायला मिळणार म्हणून खूप excite झाले होते आणि असं स्वतंत्र रहाण्याचा मनापासून आनंदही घेत होते.इतक्या दिवसात कधीही मला कणभरही भीती वाटली नव्हती.या वेळी मात्र मनात कुठेतरी खोल रुतून बसलेली गोष्ट भसकन समोर यावी तसं झालं. तेव्हा कळलं नाही पण आता लक्षात येतंय, एकटं रहाणं तेव्हा खऱ्या अर्थाने समोर आलं. इथे रहाताना माझ्याबाबतीत जे काय घडेल ते फक्त माझ्यामुळेच असेल हे तेव्हा उमजलं.