मनसोक्त निरूद्देश भटकणं अवघड झालंय आजकाल ,
त्याच जुन्या गल्लीतले लोक आता अनोळखी नजरेने पहातात
एकट्याने फिरायची तर परवानगीच नाहीये
कधी गेलंच कुठे एकटं ,
तर त्यांची संशयीत नजर तुमच्या बरोबर नसलेल्या दुसऱ्याला शोधत रहाते
तुमच्या येण्याची कारणं मागत रहातात ,नजरेतून ,वागण्यातून
त्यांच्या अपेक्षेत बसणारी उत्तरं माझ्याकडे नसतातच ,
आणि नसतात त्यांना हवे असलेले प्रश्नही
अजून एक वाट बंद झाली असं मनाशीच म्हणत मी हळूच तिथून निघून येते ,
मात्र अजून न भेटलेल्या वाटेची आस खोलवर तशीच असते.