आज, उद्या, परवा, महिने, वर्षं अशीच निघून जातात. आपल्याच इच्छा, स्वप्नं, अपेक्षा, आपली असलेली आणि नसलेली माणसं सगळ्यांनी भोवती फेर धरलेला असतो. आपणही त्यांच्या तालात ताल मिळवू बघतो. कधी हे स्वप्न पकड, कधी त्या इच्छेकडे धाव घे, कधी कोणाला चुचकारून बघ. फिरता फिरता लक्षात येतं, जमीन तर कधीच सुटली. आता पाय ठेवायला इथे कुठेच काही नाही.जीव कासावीस होतो.
कशाचा आधार शोधायचा तेच कळेनासं होतं. सगळा निरर्थकाचा भोवरा. खोल खोल जावं तसं अजून अजून रिकामी होत जाणारी ओंजळ . का, कशासाठी, कोणासाठी, कुठवर हे कधीच न सुटलेले प्रश्न.
क्वचित कधी पाय जमिनीवर टेकतात.स्वतःचीच पाळंमुळं तपासून बघू लागतात. मातीत हात घालून तण काढताना, अप्रतिम मराठीतली एखादी जबरदस्त कविता ऐकताना, मन लावून नाटक करताना, स्वतःला वाटतं ते हे असं तोडक्या मोडक्या, तुटपुंज्या शब्दात बसविताना, आपल्या असण्याचाच भाग असलेलं काहीतरी अनुभवताना. मुळाशी पोचल्याचा, आपल्याच गाभ्याला स्पर्श करून येण्याचा तेवढा क्षण काय तो खरा. तो क्षण संपल्यावर येणारा रितेपणाही खरा. बाकी सगळा नुसताच गलबला.