कोणत्याशा एका काळात कुठल्याश्या एका दिवशी त्या ओसाड माळरानावर एका माणसाची आकृती येताना दिसू लागली. आता ही घटना नवलाची असूही शकेल पण नवल करायला लांब लांबपर्यंत तिथे होतंच कोण? त्याच्या आधी इथे कोणी आलं होतं का, आलं असेल तर कशासाठी आणि इथून पुढे कोणत्या रस्त्याने गेलं ह्याची मोजदाद वरचं निळंभोर आकाश नाहीतर खाली पसरलेली वैराण जमीन ह्यांनी केली असेल तरच ! नाही म्हणायला त्या सगळ्या रखरखाटात कसं कोण जाणे पण एक बारीकसं झाड मात्र तग धरून होतं. त्या झाडाला लागूनच एक अगदी लहानशी देऊळवजा झोपडीदेखील होती. त्याच्या आत कधी कोणी डोकावलं होतं का आणि असेल तर त्याचं पुढे काय झालं हे कळायला मात्र काही मार्ग नाही.
हा येणारा माणूस मात्र काही विशिष्ट उद्देशाने तिथे आला असावा. अनेक दिवसांचा प्रवास केल्यानंतर आलेला थकवा त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता. पण ते एकुलतं झाड दृष्टीपथात आलं तसा त्याचा चालण्याचा वेग आपसूकच वाढला. त्या झोपडीपर्यंतचं शेवटचं अंतर तर त्याने जवळ जवळ पळतच पूर्ण केलं. काही शोधत असल्यासारखा त्याने त्या झाडाभोवती आणि झोपडीच्या आसपास तीन चार प्रदक्षिणा घातल्या. शेवटी काहीसा निराश होऊनच तो आत शिरला. बरोबर मध्यभागी असलेला एक दगडी चौथरा, त्याच्यावर एक देवाची मूर्ती आणि कमालीची स्वच्छता वगळता झोपडीत काहीही नव्हतं. तहानलेला, भुकेजलेला आणि दमलेला असा तो तिथेच एका भिंतीला टेकून बसला. बाहेरून क्वचित येणारी हलकी झुळूक आणि नीरव शांतता यामुळे लवकरच त्याला झोप लागली.
बहुधा बराच वेळ गेला. निदान जाग येताना तरी त्याला तसंच वाटलं. दूरवरून येतो आहेसा वाटणारा ततकार जसं आजूबाजूचं भान आलं तसा अगदी जवळच आणि स्पष्ट ऐकू येऊ लागला. उठून बसत डोळे नीट उघडून बघितलं तर त्याला एक वेगळंच दृश्य दिसलं. देवाच्या मूर्तीसमोर एक स्त्री नृत्य करण्यात मग्न होती. अत्यंत साधा वेष आणि समाधानी चेहेरा. ही कोण आणि इथे का आली आहे असे प्रश्न खरंतर त्याला पडलेच होते. पण तिचं त्याच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं. ती आपल्याच नादात होती . ती समाधी त्याच्याने मोडवेना आणि तिथून नजरही हटेना. काहीतरी मंत्रमुग्ध करणारं त्या नृत्यात होतं खास ! तालात पडणारी पावलं आणि एका लयीत हलणारं शरीर …मनातली भक्ती चेहेऱ्यावर उमटत होती आणि देहातून पाझरत होती. जणू ती तिच्या नृत्यातून एकाग्रपणे देवाची पूजा करीत होती.
बघता बघता अचानक त्याचा चेहेरा उजळला. कितीक दिवस जे शोधत वणवण फिरत होता ते एकदम गवसल्यासारखं झालं. तुकड्या-तुकड्यांनी जगायचा कंटाळा आला म्हणून आपण बाहेर पडलो. हे असंच एकसंध काहीतरी हवंय आपल्याला. हिच्याकडेच तो मार्ग मिळेल. खात्रीच पटली त्याची. हरप्रकारे तिचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न त्याने सुरू केला. पण ती जशी काही नव्हतीच या जगात. त्याची सगळी शक्ती तिच्याशी बोलून उत्तर मिळवण्यासाठी एकवटली. पण तिची एक नजरही त्याच्याकडे गेली नाही. शेवटी थकून आपले हातवारे थांबवत असतानाच काही एक उमगत गेलं मग त्याला. दमून तो झोपडीबाहेर आला तेव्हा त्याचा निश्चय झाला होता.
पुढे… पुढे काय ? पुढे तो आपल्या वाटेने निघून गेला. ते ओसाड माळरान अजून तसंच आहे. अशाच एखाद्या चुकल्या पांथस्थाची वाट बघत !