सरकारच्या कामकाजावर आणि धोरणांवर टीका करणे किंवा आपल्या आवडीचे सरकार आहे म्हणून त्याच्या सर्व निर्णयांचे सरसकट कौतुक करत सुटणे फारच सोपे आहे. पण खरोखरच ही धोरणे काय आहेत? त्याची कारणे काय? परिणाम कोणते? अमुक एका धोरणातून देशाचा विकास साधला जाईल का? असा अभ्यास करून कोणताही निर्णय आणि चर्चा समजून घेणे हे जबाबदार नागरिकाचे लक्षण आहे.
देशातील विविध प्रांतातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणून अशाप्रकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील धोरणांचा अभ्यास करावा यासाठी चेन्नई आणि बंगलोर येथील काही जणांनी मिळून तक्षशीला ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसलेली , non -profit आणि स्वायत्त अशी संस्था सुरू केली. अर्थशास्त्र, शिक्षण, परराष्ट्र धोरण इत्यादी विषयातील मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करणे, लेख लिहिणे, ते लेख जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचावेत यासाठी प्रयत्न करणे, एकूणच समाजात वैचारिक सहिष्णुता रुजावी यासाठी प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे उद्देश. तसेच सरकारी संस्था आणि एनजीओ यांना धोरणे ठरविण्यासाठी सल्लागार म्हणून देखील तक्षशीला काम करते.
विविध विषयांवरील लेख त्यांच्या ब्लॉगवर नियमित प्रकाशित होत असतात. त्यातील प्रणय कोटस्थाने यांनी लिहिलेल्या चाहतें बेशुमार, संसाधनों का तंग हाल ह्या लेखाचा मराठीत अनुवाद करायची संधी मला मिळाली. कोणत्याही वस्तूची किंमत कशी ठरते ? ह्या अत्यंत मूळ प्रश्नावर यात टिप्पणी आहे. जास्तीत जास्त प्रादेशिक भाषांमध्ये अशा मूलभूत विषयांवरील माहिती लिहिली जाऊन ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी यासाठी ह्या ब्लॉगवर इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, कन्नड , मराठी अशा भाषांमध्येही लेख प्रकाशित केले जातात. मराठीत भाषांतर करताना मजा तर आलीच शिवाय अर्थशास्त्राची काहीही पार्श्वभूमी नसलेल्या मला एक महत्त्वाची संकल्पना समजली. मराठीतील अनुवाद - वाढता हव्यास आणि संसाधनांचा तुटवडा