Tuesday, April 13, 2010

विहीर

तसं पहायला गेलं तर 'विहीर' या चित्रपटामध्ये नचिकेतचा मृत्यू सोडून रुढार्थाने काहीच घडत नाही.बाकी सगळा चित्रपट नचिकेतचा जवळचा मावसभाऊ समीरवर या मृत्यूचा काय परिणाम होतो याभोवती फिरतो.

नचिकेतच्या अचानक जाण्याने सैरभैर झालेल्या समीरच्या मनात प्रचंड खळबळ माजली आहे.पण त्याच्या आजूबाजूची माणसं, घटना पूर्वीसारख्याच आहेत. बाहेरून तोही शक्य तेवढा भोवतालच्या जगाशी सुसंगत वागायचा प्रयत्न करतोय.पण एकीकडे सतत तो घडलेल्या गोष्टीचा ,नचिकेतच्या आधीच्या बोलण्याचा विचार करतोय, त्याला वेगवेगळे प्रश्न पडतायत.

त्याचं शाळेत जाणं, पोहायला जाणं ,अस्वस्थ होऊन घरातून निघून जाणं... या सगळ्या घटना दाखवताना विविध चौकटींचा,दृश्यांचा वापर होतो.मध्येच एक बाई पाणी भरताना दिसते ,एक माणूस घोड्यावरून जाताना दिसतो , बिल्डिंग मधली भांडणं ... वरवर पहाता या सगळ्या चौकटी किंवा दृश्ये संदर्भहीन आणि एकमेकांशी विसंगत वाटतात. पण त्याचा एकत्रित विचार केला तर सभोवतालच्या routine, एकसुरी वातावरणात राहूनही चाललेली समीरच्या मनातली घालमेल,त्याला बसलेला धक्का या गोष्टी अधोरेखित होतात. त्याची जी आतल्याआत उलथापालथ चालू आहे त्याचं बाहेरच्या कोणालाच काही देणंघेणं नाहीये.त्यांच्या ती लक्षातही येत नाहीये.स्वतः समीर तर या भोवतालच्या जगात असून नसल्यासारखा झालाय.

हे सगळं बघताना बरेच प्रेक्षक कंटाळतात (त्यात मी पण आले).कारण इतका वेळ चित्रपट बघूनही अजून काहीच 'घडत' नाहीये असं वाटतं.पण मुळात पडद्यावर दुसऱ्या कोणाच्यातरी आयुष्यात घडणाऱ्या घटना बघताना त्या केवळ बघूनच समजतात असं नाही तर कधीकधी अनुभवाव्या लागतात. आपल्याला मात्र त्यात काहीतरी निष्कर्ष निघायला हवा असतो.मग तो दिग्दर्शकाने तरी काढून द्यावा किंवा आपल्याला काढायला वाव ठेवावा.विहीर मध्ये नेमकं यातलं काहीच होत नाही.एखादं चित्र असावं तसा हा चित्रपट दिसतो.

कुठल्याही नाटकाच्या ,चित्रपटाच्या किंवा कलाकृतीच्या मागचा अगदी मूळ हेतू हा ती बनवणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे किंवा भावनांचे सादरीकरण (presentation) अथवा प्रकटीकरण (expression) हा असतो. जेव्हा कलाकृतीमधून एखादा विचार मांडायचा असतो तेव्हा तो समजणं तेवढं कठीण जात नाही.कारण ते समजून घेणं जाणीवेच्या पातळीवर असतं.तुम्ही समोर घडणारी घटना बघता ,त्यावर विचार करता,तो दिग्दर्शकाच्या म्हणण्याशी पडताळून पहाता. पण जेव्हा एखाद्या भावनेचे बारकावे मांडले जातात तेव्हा ही प्रक्रिया ज़रा वेगळी होते. एकदम संवेदनशील कलाकृती बनवताना ती बनवणारा ज्या मनःस्थितीत असतो किंवा ज्या अनुभवातून गेलेला असतो त्याचा अंदाज बघणाऱ्याला येईलच असं नाही. ते समजून घेणं हे बघणाऱ्याच्या मानसिकतेवर, संवेदनशीलतेवर ,त्याने आजवर अनुभवलेल्या गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणूनच अशा कलाकृतीमधून रुढार्थाने काही 'takeaway' नसला तरी ती नेणिवा समृद्ध करणारा एक अनुभव देऊ शकते.

2 comments:

Salil said...

"एकदम संवेदनशील कलाकृती बनवताना ती बनवणारा ज्या मनःस्थितीत असतो किंवा ज्या अनुभवातून गेलेला असतो त्याचा अंदाज बघणाऱ्याला येईलच असं नाही." - एकदम पटलेलं आहे!
आणि म्हणूनच कलाकृती बघणार्याचा ती समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा कंटाळा येऊन बंद पडणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी ती कलाकृती बनवणारयाची असते!

आश्लेषा said...

@सलील ,बरोबर आहे. पण अशी काळजी घेणं हे जरा tricky होतं.कारण चित्रपटात मांडलेल्या भावना समजून घेणे ही प्रक्रिया जर subjective असेल,तर कोणाला कंटाळा येईल कोणाला येणार नाही.त्यामुळे दिग्दर्शकाचे प्रयत्न आपण "जमलंय" किंवा "नाही जमलं" असे सरळसरळ categorize करू शकत नाही.