Friday, May 14, 2010

पारतंत्र्य

स्थळ:पाणीपुरीची एक टपरी.
एक सुखवस्तू कुटुंब पाणीपुरी खात होतं. आई-बाबा आणि दोन पाच ते दहा वर्षांची मुलं. बाबा त्या पाणीपुरी विकणाऱ्या माणसाला मध्येच म्हणाले "ए ,ह्यात पाणी घाल रे जरा अजून". वाक्य तसं साधंच पण म्हणायची पद्धत किंवा tone साधा नव्हता. त्यात त्या विकणाऱ्याबद्दलची तुच्छता आणि स्वतःबद्दलचा माज ठासून भरलेला होता.

आपण चांगल्या खात्यापित्या घरातले, कुठेतरी white collar नोकरी नाहीतर व्यवसाय करणारे म्हणून हातगाडीवर काहीतरी विकणाऱ्यापेक्षा किंवा हॉटेल मधल्या वेटरपेक्षा वरचढ आहोत आणि त्यांच्याशी कसंही बोलू शकतो,असं का वाटतं ? साधी गोष्ट आहे,ज्याची आपली ओळख नाही अशा माणसाशी बोलताना आपण अहो-जाहो वापरतो किंवा अरे-तुरे केलं तरी त्यात तुच्छता नसते. हे जर एरवी आपण करू शकतो तर वॉचमन ,हातगाडीवाले, वेटर , मोलकरणी यात अपवाद का? मग आपलं काम केल्याबद्दल त्यांना thank you म्हणणं तर सोडाच. एखादा माणूस योग्य मार्गाने कष्ट करून स्वतःचं पोट भरत असेल तर किमान अपेक्षित असणारा आदर देखील त्याला द्यायचा का नाही हे तो white collar काम करतो का blue collar यावर का ठरतं ?

एकूणच आपण भारतीय लोक शारीरीक श्रमांना फारशी किंमत देत नाही यात काही नवीन नाही. the interesting question is "why" are we like this? मुळात शेतीप्रधान देश, सगळ्या प्रकारच्या लोकांना सामावून घेण्याचा इतिहास ,त्याला पूरक अशी प्राचीन समाजव्यवस्था असं सगळं असतानाही ही शारीरीक कष्टांना कमी लेखण्याची वृत्ती आली कोठून? एक शक्यता वाटते...दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केल्यानंतर आणि त्याच्याही आधी वेगवेगळ्या परकीय आक्रमणांचा अनुभव घेतल्यानंतर जो प्रगत तो वरचढ हे तत्त्व आपल्या लक्षात आलंच असणार. त्यांनी जशी आपल्यावर सत्ता गाजवली तशी आपण आपल्याच देशातल्या कमी प्रगत लोकांवर गाजवायची हे इतक्या वर्षांत आलेल्या न्यूनगंडातून रुजलं असावं. मग ज्याच्याकडे जास्त पैसा,शिक्षण,सोयी-सुविधा किंवा हे सगळं आहे तोच प्रगत आणि म्हणून वरचढ. त्यातूनच अशा so called वरचढ लोकांमध्ये आलेली इतरांबद्दलची तुच्छतेची भावना.

एखाद्या राजवटीचे फक्त राजकीयच नव्हे तर समाजाच्या मानसिकतेवर देखील किती खोलवर परिणाम होऊ शकतात.

p.s - discussion with siddhya

7 comments:

Naniwadekar said...

> वेगवेगळ्या परकीय आक्रमणांचा अनुभव घेतल्यानंतर जो प्रगत तो वरचढ हे तत्त्व आपल्या लक्षात आलंच असणार.
>---------

'ज़ो पैसा-बुद्‌धी-बळ वगैरेंमुळे प्रगत तो वरचढ बनू पाहतो' ही मानवी मनाची ठेवण आहे. त्याचा परकीय आक्रमणांशी संबंध नाही. रावण-कंस यांच्यापुढे कुठल्या परकीय आक्रमकांचे आदर्श होते? रामानी वनात फिरणे आणि सिंहासनावर बसणे यात कुठे मोठा फरक आहे, असं दशरथ का म्हणाला नाही? चौदा वर्षांचा तर प्रश्न होता. तीस वर्षांपूर्वी साधा फोन मिळायला भारतात वीस वर्षं लागायची. आज़ोबा नातवासाठी वड-पिम्पळ-आम्बा झाडे लावोत, न लावोत, फोनचा नम्बर लावायचा नक्की विचार करायचे.

श्रमजीवी लोकांची पिळवणूक होते, हे खोटं नाही. तुम्ही लिहिताच ज़बरदस्त. आता शेती असलेला माझा एक मालगुज़ार मित्र म्हणतो की कष्टकर्‍यांशी कठोरच वागावं लागतं. ते एकदम पटत नाही. पण पंजाबातली खलिस्तानी चळवळ चिरडणारे के पी एस गिल जेव्हा 'भारतीय लोकांना लाथा घालूनच सरळ ठेवावं लागतं' म्हणतात तेव्हा आपण मान डोलवतो. सन्दर्भ बदलला की आपली प्रतिक्रिया बदलते.

लेख चांगला आहे; हात लिहिता ठेवणे हा माझा आधीचा सल्ला परत एकदा मांडतो.

Girija said...

छान लिहिलयस.
"एखादा माणूस योग्य मार्गाने कष्ट करून स्वतःचं पोट भरत असेल तर किमान अपेक्षित असणारा आदर" - अगदी!

jkbhagwat said...

It is sad that most of us do not recognige the self respect of those who survive on the basic minimum.If you say thank you(which I do everytime I get some thing done by , lets say a waiter , or a vendor) the result is , a gesture of gratitude displayed by a smile on the face of the person .In the west it is almost a rule to be courteous to those who serve you .When will we learn the good things of the west
--JKBhagwat

आश्लेषा said...

@Naniwadekar : श्रमजीवी लोकांची पिळवणूक ही तर खूप पुढची गोष्ट आहे. आपल्याला सेवा पुरवणार्याला किमान आदर द्यावा एवढेच म्हणणे आहे.
@Megha : धन्यवाद :)
@jkbhagwat : you are absolutely right...that's what I wanted to say.

Naniwadekar said...

सेवा पुरवणारे जेव्हा सौजन्याचा गैरफायदा घेतात तेव्हा दुसरी व्यक्ती आखूड वागू शकते आणि त्रयस्थाला तो माज़ोरडेपणा वाटू शकतो.

एकूण श्रमजीवी लोकांना आपण योग्य वागणूक देत नाही, हा आपला मुद्‌दा मला मान्य आहे. याबाबत गोरी संस्कृती आपल्यापेक्षा प्रगत आहे, हे पण मान्य आहे. पण भारतातही परिस्थिती सुधारते आहे.

Naniwadekar said...

मी कट्टर संस्कृतविरोधक असल्यामुळे मला 'शेतीप्रधान देश' हा मराठी प्रयोग आवडला. 'कृषीप्रधान' वगैरे माझ्यासारख्या असंस्कृताला न समज़णारे प्रयोग टाळलेले चांगलेच. तुम्ही 'सुभाषित'वाल्या आहात, तेव्हा संस्कृतविरोधी बोलल्याबद्‌दल रागावू नका हो, बाई. बोज़ड भाषा शोभते तिथेच वापरावी, असं माझं आपलं एक अशिक्षित मत आहे.

Anonymous said...

Sharirik shramachi kam karnarya manasabaddal tuchhata he Bharatiya Sanskritiche puratan laxan ahe.Varna-Jativyavastha tech dershavate.ha British rajavaticha parinam nahi.