Saturday, May 04, 2013

कैवल्याच्या चांदण्याला..

आज, उद्या, परवा, महिने, वर्षं अशीच निघून जातात. आपल्याच इच्छा, स्वप्नं, अपेक्षा, आपली असलेली आणि नसलेली माणसं सगळ्यांनी भोवती फेर धरलेला असतो. आपणही त्यांच्या तालात ताल मिळवू बघतो. कधी हे स्वप्न पकड, कधी त्या इच्छेकडे धाव घे, कधी कोणाला चुचकारून बघ. फिरता फिरता लक्षात येतं, जमीन तर कधीच सुटली. आता पाय ठेवायला इथे कुठेच काही नाही.जीव कासावीस होतो. कशाचा आधार शोधायचा तेच कळेनासं होतं. सगळा निरर्थकाचा भोवरा. खोल खोल जावं तसं अजून अजून रिकामी होत जाणारी ओंजळ . का, कशासाठी, कोणासाठी, कुठवर हे कधीच न सुटलेले प्रश्न.


क्वचित कधी पाय जमिनीवर टेकतात.स्वतःचीच पाळंमुळं तपासून बघू लागतात. मातीत हात घालून तण काढताना, अप्रतिम मराठीतली एखादी जबरदस्त कविता ऐकताना, मन लावून नाटक करताना, स्वतःला वाटतं ते हे असं तोडक्या मोडक्या, तुटपुंज्या शब्दात बसविताना, आपल्या असण्याचाच भाग असलेलं काहीतरी अनुभवताना. मुळाशी पोचल्याचा, आपल्याच गाभ्याला स्पर्श करून येण्याचा तेवढा क्षण काय तो खरा. तो क्षण संपल्यावर येणारा रितेपणाही खरा. बाकी सगळा नुसताच गलबला.

Wednesday, March 27, 2013

भाषासु मुख्या मधुरा - २

ह्या संस्कृतवर्गाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत बोलण्यावर बराच भर दिलेला होता. आता संस्कृत भाषा बोलायला शिकायची काय गरज ? असा प्रश्न पडू शकतो किंवा बापरे, संस्कृत बोलायचं, केवढं अवघड आहे ते!! असंही वाटू शकतं. ह्याचं माझ्यापुरतं तरी उत्तर असं आहे - कोणतीही भाषा शिकताना जर आपल्या रोजच्या सवयीच्या गोष्टी त्या भाषेत मांडता आल्या , व्यक्त करता आल्या तर ती भाषा वापरता येण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि ती जास्त जवळची वाटते. शिवाय साधी, सरळ आणि नेहमीची वाक्ये बोलून सुरुवात केली तर ते तितकं अवघडही वाटत नाही. ह्यासाठी आधी काही रोजच्या वापरातल्या वस्तूंसाठी असणाऱ्या शब्दांची आणि काही सर्वनामांची (pronoun) आम्हाला ओळख करून दिली. नंतर त्याचा उपयोग करून छोटी वाक्ये बनवायला सांगितली. सुरुवातीला फक्त हे शब्द आणि त्यापुढे एकच क्रियापद (अस्ति - is ) वापरून वाक्य बनविता आल्यानंतर हळूहळू अजून क्रियापदं, अजून वेगवेगळे शब्द, सर्वनामं, व्यवसाय, नातेसंबंध, आकडे, वेळ, वार, भूतकाळ, भविष्यकाळ अशी त्यात भर घालत गेलो. "लहान सुटसुटीत वाक्यं बनवायची" या एकाच नियमामुळे कितीतरी वाक्यं विचारातला आणि भाषेतला क्लिष्टपणा टाळून बनवता आली.

गोष्ट लिहिणे आणि सांगणे हा वर्गातला गटामध्ये करायचा एक उपक्रम  होता. एखादी चित्रमालिका देउन किंवा साधारण रूपरेषा देउन त्यावर संस्कृतमध्ये गोष्ट लिहायची. गोष्ट आपली नेहेमीचीच, तहानलेला कावळा किंवा तत्सम. सुरुवातीला अर्थातच आधी इंग्लिशमध्ये वाक्य ठरवणे आणि मग संस्कृतातल्या माहित असलेल्या थोड्याफार शब्दासंग्रहामध्ये ते वाक्य बसवणे अशी कसरत करता करता पानभर गोष्ट बनवल्यावर एकदम भारी वाटलं. शिवाय स्वतः संपददा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही उत्तम बडबडगीते रचली आहेत. कोणतीही भाषा शिकताना त्यातल्या गोष्टी आणि अशी गाणी फारच उपयोगी पडतात. गोष्टींमुळे  बोलीभाषेचा चांगला परिचय होतो तर गाण्यांमुळे भाषेची लय कळते आणि ती तोंडातही बसते. संस्कृतला मुळातच एक लय असल्याने ही बडबडगीते ऐकायला आणि म्हणायला अजूनच गोड वाटतात. संपददांनी रचलेलं हे एक गाणं : 
                           एषः वृक्षः विशालवृक्षः 
                            वृक्षे  नीडः अतिलघुनीडः |
                            नीडे पक्षी  पीतः पक्षी 
                            करोति  गानं  चिचिचि  चिचिचि  चिचिचि  चिचिचि  ||

सुसूत्र आणि सुसंबद्ध व्याकरण ही संस्कृतची खासियत. पाणिनी, पतंजली आणि कात्यायन हे तिघे आद्य व्याकरणकार.  पाणिनीने लिहिलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ संपूर्ण संस्कृत व्याकरणाचा पाया आहे. यात जवळजवळ चार हजार सूत्रांमध्ये व्याकरण विवेचन केले आहे. जाता जाता सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ श्लोकरूपात किंवा पद्यरूपात आहे. संस्कृतमध्ये बोलायची थोडीफार सवय झाल्यानंतर आम्हाला अगदी मूलभूत आणि गरजेपुरतं व्याकरण शिकवलं.
                           यद्यपि बहु नाधिषे
                           तथापि पठ पुत्र व्याकरणम् ।
                           स्वजनः श्वजनो मा भूत ,
                           सकलं शकलं, सकृत शकृत ॥

(हे मुला, जरी खूप शिकला नाहीस तरी थोडंसं व्याकरण जरूर शीक. जेणेकरून स्वजन (नातेवाईक) ऐवजी श्वजन (कुत्रा) , सकल (सर्व) ऐवजी शकल (तुकडे) आणि सकृत (एकावेळेस) ऐवजी शकृत ( विष्ठा) करणार (लिहिणार / बोलणार) नाहीस.)

कोणतेही संस्कृत लिखाण वाचायचे असेल तर संधी समजून घेणे आवश्यक आहे. सम् (एकत्र) + धा (जोडणे) ह्यापासून संधी  हा शब्द तयार झाला. दोन शब्द एकापुढे एक आल्यावर त्यांच्यात थोडेफार बदल होऊन उच्चारायला अधिक नैसर्गिक आणि प्रवाही असा तिसरा शब्द बनतो. उदा - भगवत् + गीता हे शब्द एकत्र येताना  "त्" ह्या कठोर दन्त्य ( dental ) व्यंजनानंतर "ग" हे मृदू व्यंजन येत असल्याने "त" चे रुपांतर त्याच गटातील "द" ह्या मृदू व्यंजनात होते आणि भगवद्गीता हा शब्द तयार होतो. किंवा "सूर्य उदय" असे दोन शब्द वेगळे उच्चारले तर बोलताना मध्येच अडथळा आल्यासारखे वाटते. पण त्याऐवजी सूर्य मधला "अ" आणि उदय मधला "उ" एकत्र करून त्याचा "ओ" झाला की सूर्योदय हा शब्द उच्चारायला आणि ऐकायला सहज वाटतो. अशा तऱ्हेने तयार झालेल्या प्रवाही शब्दांमुळे संस्कृत बोलायला आणि ऐकायला अतिशय लयबद्ध आहे.

ज्यांनी ही कार्यशाळा घेतली ते SAFIC चे director डॉ. संपदानंद मिश्र यांच्या कामाबद्दल इथे थोडं सांगितलंच पाहिजे. संस्कृत संबंधित विविध संशोधन प्रकल्पांवर SAFIC मध्ये काम चालते.  ह्या प्रकल्पाचाच भाग म्हणून त्यांनी भगवद्गीतेवर एक मल्टिमिडीया सीडी बनविलेली आहे. त्यामध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक, त्याचा अर्थ, त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ, श्लोकाच्या छंदाचे विवेचन, तो श्लोक योग्य उच्चारांसह कसा म्हणायचा याचे प्रात्यक्षिक अशा सर्व गोष्टी आहेत. याखेरीज वेद, उपनिषदे यावरही अशा पद्धतीचे प्रकल्प चालू आहेत. त्याबरोबरच संस्कृतचा प्रसार करणे आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी संस्कृत हे एक माध्यम म्हणून अंगीकारणे हे त्यांचे उद्देश आहेत. त्यादृष्टीने हे वर्ग घेतले जातात. या कार्यशाळेसाठी अक्षरशः देशभरातून आणि परदेशातूनही लोक आले होते. प्रत्येकाचा यायचा उद्देश वेगळा होता. कोणी भाषेची आवड म्हणून , कोणी त्यांच्या भाषिक अभ्यासाचा एक भाग म्हणून, कोणी उत्सुकता म्हणून तर काही लोक त्यांच्या अध्यात्मिक साधनेचा एक भाग म्हणून तिथे आले होते. पण आम्हाला प्रत्येकालाच त्यातून काही ना काही मिळालं हे खरं .

Thursday, March 14, 2013

भाषासु मुख्या मधुरा - १

 श्री ऑरोबिंदो सोसायटीच्या Sri Aurobindo Foundation for Indian Culture (SAFIC) ह्या विभागाने पॉन्डीचेरी येथे सहा दिवसांची संस्कृत कार्यशाळा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केली होती. केवळ संस्कृतची आवड आणि नवीन ठिकाणी जायची उत्सुकता एवढ्या दोन गोष्टी मला तिकडे जायला पुरेशा होत्या. SAFIC चे संचालक डॉ . संपदानंद मिश्र यांनी ही कार्यशाळा घेतली. संस्कृतसंदर्भात जे काही तिथे शिकायला मिळालं ते इथे शब्दात मांडून ठेवायला बघतेय. अर्थातच खूप गोष्टी राहून जायची शक्यता आहे. पण तरी …

साधारणपणे आपल्याकडे शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे संस्कृत शिकवतात त्यात भरपूर पाठांतर आणि  क्लिष्ट व्याकरण ह्यावर भर असतो. ह्यापलीकडे जाउन त्या भाषेचा आस्वाद घेणे हा प्रकार तसा कमीच होतो. संस्कृत शिकायची सुरुवात होते ती हमखास - देव, वन, माला असे शब्द चालवून. आता शब्द चालवणे म्हणजे नक्की काय? तो का चालवायचा? हे सुद्धा तेव्हा कळलेलं नसतं. मग पुढे त्यातच भर पडत जाते , परस्मैपदी धातू , आत्मनेपदी धातू, वर्तमानकाळ, भूतकाळ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संधी, समास इत्यादी इत्यादीची. मूळ भाषा, तिचा लहेजा, तिचं सौंदर्य, तिच्यामागचं तर्कशास्त्र हे सगळं कुठेतरी हरवून आपण येड्यासारखे पाठ करीत बसतो आणि मार्क मिळवतो ( स्कोरिंगला संस्कृत बरं पडतं !!!)

संपददांच्या वर्गात ह्या पाठांतराला पूर्ण फाटा दिलेला होता. सुरुवात झाली ती वर्णमालेपासून. वर्णमालेचे दोन मुख्य विभाग - स्वर (vowels) अणि व्यंजने (consonants). स्वयं राजते इति स्वरः  - जे स्वयंप्रकाशी आहेत आणि ज्यांचे अस्तित्व इतर कशावरच अवलंबून नाही  ते स्वर. अनु व्यज्यते इति व्यंजनः  - ज्यांना पूर्णत्व मिळण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते ती व्यंजने.

अक्षर म्हणजे भाषेचा अतिशय  मूलभूत घटक. हा  घटक इतका गृहीत धरलेला असतो की त्यात आपण "असं का? " हा प्रश्न विचारू शकतो असं वाटत नाही.  पण वर्णमालेत अक्षरे एका विशिष्ट क्रमानेच का येतात? व्यंजनांमध्ये पहिला "क" वर्ग (क, ख, ग, घ, ङ् ) का ? त्यानंतर "च" वर्ग (च, छ, ज, झ, ञ ) मग अनुक्रमे "ट " वर्ग (ट, ठ, ड, ढ, ण), "त" वर्ग (त, थ, द, ध, न) आणि "प" वर्ग (प, फ, ब, भ, म ) का येतात? ह्यालादेखील योग्य असे उत्तर आहे. कोणतेही अक्षर उच्चारताना तो आवाज आपल्या तोंडातून ज्या ठिकाणाहून निघतो ते ठिकाण महत्त्वाचे असते. "क" वर्गातील सर्व अक्षरे उच्चारताना जिभेचा स्पर्श तोंडाच्या सर्वात मागच्या भागाला (guttur किंवा कंठ ) होतो.  "च" वर्गातील अक्षरांसाठी जीभ टाळूला (palate) स्पर्श करते. ह्या पद्धतीने आवाजाचे तोंडातील उगमस्थान पुढे पुढे जात "ट" वर्गातील मूर्धन्य (cerebral ) अक्षरे, "त" वर्गातील दन्त्य (dental) आणि "प" वर्गातील ओष्ठ्य (labials) अक्षरे तयार होतात. प्रत्येक वर्गातील पहिले अक्षर (क, च, ट, त, प) ही कठोर व्यंजने असून ती उच्चारताना श्वास रोखला जातो . दुसरे अक्षर (ख, छ, ठ, थ, फ) हे देखील कठोर व्यंजन पण उच्चारताना श्वास तोंडातून बाहेर टाकला जातो. तिसरे अक्षर (ग, ज, ड, द, ब) ही मृदू व्यंजने आणि उच्चारताना श्वास रोखावा लागतो तर चौथे अक्षर (घ, झ, ढ, ध, भ) हे देखील मृदू पण उच्चारताना श्वास तोंडावाटे बाहेर सोडावा लागेल असे आहे. प्रत्येक गटातले पाचवे अक्षर ज्याला अनुनासिक म्हणतात ( ङ्, ञ, ण, न, म) ते मृदू उच्चाराचे पण नाक आणि तोंड या दोन्हीवाटे श्वास बाहेर सोडला जातो असे आहे.

संस्कृतमधील "छंद" (आपल्या मराठीत "वृत्त"/ इंग्लिशमध्ये meter) हा एक स्वतंत्र आणि खूप मोठा विषय आहे. त्याची नुसती तोंडओळख ह्यावेळेस झाली.  "छन्दस्" या शब्दाचा मूळ अर्थ - आनंददायक किंवा सुखदायक. कोणतेही पद्य, काव्य, सुभाषित म्हणताना ते छंदाला अनुसरून असणाऱ्या चालीत म्हटलं तर म्हणताना आणि ऐकताना अतिशय गोड वाटतं. शार्दूलविक्रीडितम् , मन्दाक्रान्ता, भुजंगप्रयातम् (भुजङ्गप्रयातम्) अशी या छंदांची नावं ऐकायला अगम्य वाटली तरी त्यांचा अर्थ समजून घेतला तर प्रत्येक नावामागे काही एक विचार आहे हे लक्षात येतं.

भुजंगप्रयातम् (भुजङ्गप्रयातम्) - ह्या छंदात सापाच्या लयबद्ध हालचाली प्रमाणे शब्दांची समान रचना दिसते.

          न तातो न माता न बन्धुर्न भ्राता
          न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता |
          न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
          गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||

शार्दूलविक्रीडितम्  - वाघ आपले भक्ष्य पकडताना पहिली एक मोठी उडी घेउन मग लहान लहान उड्या मारत भक्ष्यापाशी पोचतो तसंच ह्या छंदात बसवलेले कोणतेही पद्य म्हणताना नैसर्गिकरित्या यति (pause) एकदम १२ व्या अक्षरानंतर येते. (एका ओळीत एकूण १९ अक्षरे असतात) 
          कस्तुरी तिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम्  ।
          नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणु करे कंकणम् ।

प्रत्येक छंदाला जसे विशिष्ट नियम (लक्षणे) आहेत तसाच स्वतःचा असा एक स्वभावही आहे. मन्दाक्रान्ता म्हणजे अतिशय सावकाश हालचाल. कालीदासाचं  "मेघदूत"  हे विरहकाव्य मन्दाक्रान्तामध्ये बांधलेलं आहे. दुःख, विरह इत्यादी भावना व्यक्त करायला हा छंद वापरतात. तसंच इन्द्रवज्रा ( म्हणजे इन्द्राचे शस्त्र (वज्र) ) हा छंद - शौर्यभावना किंवा कोणताही उत्कट भाव प्रभावीपणे दाखवितो.