Wednesday, March 27, 2013

भाषासु मुख्या मधुरा - २

ह्या संस्कृतवर्गाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत बोलण्यावर बराच भर दिलेला होता. आता संस्कृत भाषा बोलायला शिकायची काय गरज ? असा प्रश्न पडू शकतो किंवा बापरे, संस्कृत बोलायचं, केवढं अवघड आहे ते!! असंही वाटू शकतं. ह्याचं माझ्यापुरतं तरी उत्तर असं आहे - कोणतीही भाषा शिकताना जर आपल्या रोजच्या सवयीच्या गोष्टी त्या भाषेत मांडता आल्या , व्यक्त करता आल्या तर ती भाषा वापरता येण्याचा आत्मविश्वास वाढतो आणि ती जास्त जवळची वाटते. शिवाय साधी, सरळ आणि नेहमीची वाक्ये बोलून सुरुवात केली तर ते तितकं अवघडही वाटत नाही. ह्यासाठी आधी काही रोजच्या वापरातल्या वस्तूंसाठी असणाऱ्या शब्दांची आणि काही सर्वनामांची (pronoun) आम्हाला ओळख करून दिली. नंतर त्याचा उपयोग करून छोटी वाक्ये बनवायला सांगितली. सुरुवातीला फक्त हे शब्द आणि त्यापुढे एकच क्रियापद (अस्ति - is ) वापरून वाक्य बनविता आल्यानंतर हळूहळू अजून क्रियापदं, अजून वेगवेगळे शब्द, सर्वनामं, व्यवसाय, नातेसंबंध, आकडे, वेळ, वार, भूतकाळ, भविष्यकाळ अशी त्यात भर घालत गेलो. "लहान सुटसुटीत वाक्यं बनवायची" या एकाच नियमामुळे कितीतरी वाक्यं विचारातला आणि भाषेतला क्लिष्टपणा टाळून बनवता आली.

गोष्ट लिहिणे आणि सांगणे हा वर्गातला गटामध्ये करायचा एक उपक्रम  होता. एखादी चित्रमालिका देउन किंवा साधारण रूपरेषा देउन त्यावर संस्कृतमध्ये गोष्ट लिहायची. गोष्ट आपली नेहेमीचीच, तहानलेला कावळा किंवा तत्सम. सुरुवातीला अर्थातच आधी इंग्लिशमध्ये वाक्य ठरवणे आणि मग संस्कृतातल्या माहित असलेल्या थोड्याफार शब्दासंग्रहामध्ये ते वाक्य बसवणे अशी कसरत करता करता पानभर गोष्ट बनवल्यावर एकदम भारी वाटलं. शिवाय स्वतः संपददा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही उत्तम बडबडगीते रचली आहेत. कोणतीही भाषा शिकताना त्यातल्या गोष्टी आणि अशी गाणी फारच उपयोगी पडतात. गोष्टींमुळे  बोलीभाषेचा चांगला परिचय होतो तर गाण्यांमुळे भाषेची लय कळते आणि ती तोंडातही बसते. संस्कृतला मुळातच एक लय असल्याने ही बडबडगीते ऐकायला आणि म्हणायला अजूनच गोड वाटतात. संपददांनी रचलेलं हे एक गाणं : 
                           एषः वृक्षः विशालवृक्षः 
                            वृक्षे  नीडः अतिलघुनीडः |
                            नीडे पक्षी  पीतः पक्षी 
                            करोति  गानं  चिचिचि  चिचिचि  चिचिचि  चिचिचि  ||

सुसूत्र आणि सुसंबद्ध व्याकरण ही संस्कृतची खासियत. पाणिनी, पतंजली आणि कात्यायन हे तिघे आद्य व्याकरणकार.  पाणिनीने लिहिलेला अष्टाध्यायी हा ग्रंथ संपूर्ण संस्कृत व्याकरणाचा पाया आहे. यात जवळजवळ चार हजार सूत्रांमध्ये व्याकरण विवेचन केले आहे. जाता जाता सांगायचे वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण ग्रंथ श्लोकरूपात किंवा पद्यरूपात आहे. संस्कृतमध्ये बोलायची थोडीफार सवय झाल्यानंतर आम्हाला अगदी मूलभूत आणि गरजेपुरतं व्याकरण शिकवलं.
                           यद्यपि बहु नाधिषे
                           तथापि पठ पुत्र व्याकरणम् ।
                           स्वजनः श्वजनो मा भूत ,
                           सकलं शकलं, सकृत शकृत ॥

(हे मुला, जरी खूप शिकला नाहीस तरी थोडंसं व्याकरण जरूर शीक. जेणेकरून स्वजन (नातेवाईक) ऐवजी श्वजन (कुत्रा) , सकल (सर्व) ऐवजी शकल (तुकडे) आणि सकृत (एकावेळेस) ऐवजी शकृत ( विष्ठा) करणार (लिहिणार / बोलणार) नाहीस.)

कोणतेही संस्कृत लिखाण वाचायचे असेल तर संधी समजून घेणे आवश्यक आहे. सम् (एकत्र) + धा (जोडणे) ह्यापासून संधी  हा शब्द तयार झाला. दोन शब्द एकापुढे एक आल्यावर त्यांच्यात थोडेफार बदल होऊन उच्चारायला अधिक नैसर्गिक आणि प्रवाही असा तिसरा शब्द बनतो. उदा - भगवत् + गीता हे शब्द एकत्र येताना  "त्" ह्या कठोर दन्त्य ( dental ) व्यंजनानंतर "ग" हे मृदू व्यंजन येत असल्याने "त" चे रुपांतर त्याच गटातील "द" ह्या मृदू व्यंजनात होते आणि भगवद्गीता हा शब्द तयार होतो. किंवा "सूर्य उदय" असे दोन शब्द वेगळे उच्चारले तर बोलताना मध्येच अडथळा आल्यासारखे वाटते. पण त्याऐवजी सूर्य मधला "अ" आणि उदय मधला "उ" एकत्र करून त्याचा "ओ" झाला की सूर्योदय हा शब्द उच्चारायला आणि ऐकायला सहज वाटतो. अशा तऱ्हेने तयार झालेल्या प्रवाही शब्दांमुळे संस्कृत बोलायला आणि ऐकायला अतिशय लयबद्ध आहे.

ज्यांनी ही कार्यशाळा घेतली ते SAFIC चे director डॉ. संपदानंद मिश्र यांच्या कामाबद्दल इथे थोडं सांगितलंच पाहिजे. संस्कृत संबंधित विविध संशोधन प्रकल्पांवर SAFIC मध्ये काम चालते.  ह्या प्रकल्पाचाच भाग म्हणून त्यांनी भगवद्गीतेवर एक मल्टिमिडीया सीडी बनविलेली आहे. त्यामध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक, त्याचा अर्थ, त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ, श्लोकाच्या छंदाचे विवेचन, तो श्लोक योग्य उच्चारांसह कसा म्हणायचा याचे प्रात्यक्षिक अशा सर्व गोष्टी आहेत. याखेरीज वेद, उपनिषदे यावरही अशा पद्धतीचे प्रकल्प चालू आहेत. त्याबरोबरच संस्कृतचा प्रसार करणे आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी संस्कृत हे एक माध्यम म्हणून अंगीकारणे हे त्यांचे उद्देश आहेत. त्यादृष्टीने हे वर्ग घेतले जातात. या कार्यशाळेसाठी अक्षरशः देशभरातून आणि परदेशातूनही लोक आले होते. प्रत्येकाचा यायचा उद्देश वेगळा होता. कोणी भाषेची आवड म्हणून , कोणी त्यांच्या भाषिक अभ्यासाचा एक भाग म्हणून, कोणी उत्सुकता म्हणून तर काही लोक त्यांच्या अध्यात्मिक साधनेचा एक भाग म्हणून तिथे आले होते. पण आम्हाला प्रत्येकालाच त्यातून काही ना काही मिळालं हे खरं .

4 comments:

Girija said...

aadhee maahit asayla hawe hote :)
m sure, mast anubhav asanar tujha ha. tya multimedia CD baddal adhik maahitee kaLav asalyaas. me suddha shodhate!

आश्लेषा said...

doesn't matter girija. tyancha dar june aNi january mahinyat he workshop asata. you can still attend. keep checking their website :-)

Shrinivas Tilak said...

नमस्कार येथे Montreal मध्ये काही वर्षांपूर्वी मी बोली संस्कृत च्या दोन कार्यशाळा भरवल्या होत्या. वदतु संस्कृतम चे स्वयंसेवक मोठया हौशीने आले होते. प्रतिसाद चांगला मिळाला.वीस जणात ५० टक्के Canadian होते. आपण लिहिल्याप्रमाणे वर्ग अखेरीस जवळ जवळ सर्वच छोटी छोटी वाक्ये बोलू लागले. संस्कृत भाषेत नक्कीच काहीतरी शक्ती असावी. कारण आत्मविश्वास बळावला किंवा सबलीकरण वाटले असं काही जण म्हणत होते. पण असे वर्ग सतत घ्यायला पाहिजेत नाहीतर सवय होत नाही

येथे प्रा अरविंद शर्मा दर वर्षी धर्मावर चर्चासत्र भरवतात तेव्हा सर्व व्यवहार संस्कृत मध्येच चालतात. तोही एक अनोखा अनुभव असतो.

मी तर असा विचार करीत आहे कि वर्षातले सहा महिने पुडुचेरीला रहावे. तेथे राहण्याच्या सोयीबद्दल लिहावे.

श्रीनिवास टिळक

आश्लेषा said...

श्रीनिवास टिळक, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. सतत संस्कृत भाषेत बोलत रहाणे आवश्यक आहे हे आपले म्हणणे बरोबर आहे. त्यासाठी कायम कोणीतरी समानधर्मी शोधत रहायला हवे.असो.
पुदुच्चेरी मध्ये रहाण्याची सोय आश्रमातर्फे केली जाते. म्हणजे आश्रमाची guest houses आहेत. किंवा इतरही खाजगी guest houses आहेत. औरोबिंदो सोसायटीच्या वेबसाईटवर अधिक माहिती मिळू शकेल.