Thursday, March 14, 2013

भाषासु मुख्या मधुरा - १

 श्री ऑरोबिंदो सोसायटीच्या Sri Aurobindo Foundation for Indian Culture (SAFIC) ह्या विभागाने पॉन्डीचेरी येथे सहा दिवसांची संस्कृत कार्यशाळा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केली होती. केवळ संस्कृतची आवड आणि नवीन ठिकाणी जायची उत्सुकता एवढ्या दोन गोष्टी मला तिकडे जायला पुरेशा होत्या. SAFIC चे संचालक डॉ . संपदानंद मिश्र यांनी ही कार्यशाळा घेतली. संस्कृतसंदर्भात जे काही तिथे शिकायला मिळालं ते इथे शब्दात मांडून ठेवायला बघतेय. अर्थातच खूप गोष्टी राहून जायची शक्यता आहे. पण तरी …

साधारणपणे आपल्याकडे शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे संस्कृत शिकवतात त्यात भरपूर पाठांतर आणि  क्लिष्ट व्याकरण ह्यावर भर असतो. ह्यापलीकडे जाउन त्या भाषेचा आस्वाद घेणे हा प्रकार तसा कमीच होतो. संस्कृत शिकायची सुरुवात होते ती हमखास - देव, वन, माला असे शब्द चालवून. आता शब्द चालवणे म्हणजे नक्की काय? तो का चालवायचा? हे सुद्धा तेव्हा कळलेलं नसतं. मग पुढे त्यातच भर पडत जाते , परस्मैपदी धातू , आत्मनेपदी धातू, वर्तमानकाळ, भूतकाळ, आज्ञार्थ, विध्यर्थ, संधी, समास इत्यादी इत्यादीची. मूळ भाषा, तिचा लहेजा, तिचं सौंदर्य, तिच्यामागचं तर्कशास्त्र हे सगळं कुठेतरी हरवून आपण येड्यासारखे पाठ करीत बसतो आणि मार्क मिळवतो ( स्कोरिंगला संस्कृत बरं पडतं !!!)

संपददांच्या वर्गात ह्या पाठांतराला पूर्ण फाटा दिलेला होता. सुरुवात झाली ती वर्णमालेपासून. वर्णमालेचे दोन मुख्य विभाग - स्वर (vowels) अणि व्यंजने (consonants). स्वयं राजते इति स्वरः  - जे स्वयंप्रकाशी आहेत आणि ज्यांचे अस्तित्व इतर कशावरच अवलंबून नाही  ते स्वर. अनु व्यज्यते इति व्यंजनः  - ज्यांना पूर्णत्व मिळण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते ती व्यंजने.

अक्षर म्हणजे भाषेचा अतिशय  मूलभूत घटक. हा  घटक इतका गृहीत धरलेला असतो की त्यात आपण "असं का? " हा प्रश्न विचारू शकतो असं वाटत नाही.  पण वर्णमालेत अक्षरे एका विशिष्ट क्रमानेच का येतात? व्यंजनांमध्ये पहिला "क" वर्ग (क, ख, ग, घ, ङ् ) का ? त्यानंतर "च" वर्ग (च, छ, ज, झ, ञ ) मग अनुक्रमे "ट " वर्ग (ट, ठ, ड, ढ, ण), "त" वर्ग (त, थ, द, ध, न) आणि "प" वर्ग (प, फ, ब, भ, म ) का येतात? ह्यालादेखील योग्य असे उत्तर आहे. कोणतेही अक्षर उच्चारताना तो आवाज आपल्या तोंडातून ज्या ठिकाणाहून निघतो ते ठिकाण महत्त्वाचे असते. "क" वर्गातील सर्व अक्षरे उच्चारताना जिभेचा स्पर्श तोंडाच्या सर्वात मागच्या भागाला (guttur किंवा कंठ ) होतो.  "च" वर्गातील अक्षरांसाठी जीभ टाळूला (palate) स्पर्श करते. ह्या पद्धतीने आवाजाचे तोंडातील उगमस्थान पुढे पुढे जात "ट" वर्गातील मूर्धन्य (cerebral ) अक्षरे, "त" वर्गातील दन्त्य (dental) आणि "प" वर्गातील ओष्ठ्य (labials) अक्षरे तयार होतात. प्रत्येक वर्गातील पहिले अक्षर (क, च, ट, त, प) ही कठोर व्यंजने असून ती उच्चारताना श्वास रोखला जातो . दुसरे अक्षर (ख, छ, ठ, थ, फ) हे देखील कठोर व्यंजन पण उच्चारताना श्वास तोंडातून बाहेर टाकला जातो. तिसरे अक्षर (ग, ज, ड, द, ब) ही मृदू व्यंजने आणि उच्चारताना श्वास रोखावा लागतो तर चौथे अक्षर (घ, झ, ढ, ध, भ) हे देखील मृदू पण उच्चारताना श्वास तोंडावाटे बाहेर सोडावा लागेल असे आहे. प्रत्येक गटातले पाचवे अक्षर ज्याला अनुनासिक म्हणतात ( ङ्, ञ, ण, न, म) ते मृदू उच्चाराचे पण नाक आणि तोंड या दोन्हीवाटे श्वास बाहेर सोडला जातो असे आहे.

संस्कृतमधील "छंद" (आपल्या मराठीत "वृत्त"/ इंग्लिशमध्ये meter) हा एक स्वतंत्र आणि खूप मोठा विषय आहे. त्याची नुसती तोंडओळख ह्यावेळेस झाली.  "छन्दस्" या शब्दाचा मूळ अर्थ - आनंददायक किंवा सुखदायक. कोणतेही पद्य, काव्य, सुभाषित म्हणताना ते छंदाला अनुसरून असणाऱ्या चालीत म्हटलं तर म्हणताना आणि ऐकताना अतिशय गोड वाटतं. शार्दूलविक्रीडितम् , मन्दाक्रान्ता, भुजंगप्रयातम् (भुजङ्गप्रयातम्) अशी या छंदांची नावं ऐकायला अगम्य वाटली तरी त्यांचा अर्थ समजून घेतला तर प्रत्येक नावामागे काही एक विचार आहे हे लक्षात येतं.

भुजंगप्रयातम् (भुजङ्गप्रयातम्) - ह्या छंदात सापाच्या लयबद्ध हालचाली प्रमाणे शब्दांची समान रचना दिसते.

          न तातो न माता न बन्धुर्न भ्राता
          न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता |
          न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
          गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ||

शार्दूलविक्रीडितम्  - वाघ आपले भक्ष्य पकडताना पहिली एक मोठी उडी घेउन मग लहान लहान उड्या मारत भक्ष्यापाशी पोचतो तसंच ह्या छंदात बसवलेले कोणतेही पद्य म्हणताना नैसर्गिकरित्या यति (pause) एकदम १२ व्या अक्षरानंतर येते. (एका ओळीत एकूण १९ अक्षरे असतात) 
          कस्तुरी तिलकं ललाटपटले, वक्षस्थले कौस्तुभम्  ।
          नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणु करे कंकणम् ।

प्रत्येक छंदाला जसे विशिष्ट नियम (लक्षणे) आहेत तसाच स्वतःचा असा एक स्वभावही आहे. मन्दाक्रान्ता म्हणजे अतिशय सावकाश हालचाल. कालीदासाचं  "मेघदूत"  हे विरहकाव्य मन्दाक्रान्तामध्ये बांधलेलं आहे. दुःख, विरह इत्यादी भावना व्यक्त करायला हा छंद वापरतात. तसंच इन्द्रवज्रा ( म्हणजे इन्द्राचे शस्त्र (वज्र) ) हा छंद - शौर्यभावना किंवा कोणताही उत्कट भाव प्रभावीपणे दाखवितो.

9 comments:

Girija said...

chhan ch ki! :)

Abhishek said...

उत्तम माहिती!

Yashodhan said...
This comment has been removed by the author.
आश्लेषा said...

Thanks :-)

Amar said...

व्यंजनांचे analysis माहित नव्हते, खूप मस्त explain केलं अाहेस तू

आश्लेषा said...

Amar - Thanks ! मलाही इतकं व्यवस्थित ह्या वर्कशॉप मुळेच कळलं. फारच सुंदर sessions होती.

Anonymous said...

Khup changli information. Maja ali vachatana.atta Sanskrit shikanyabaddal interest nirman zalay.

आश्लेषा said...

@Anonymous - Thanks ! Jarur sanskrit shika. maja yeil :-)

Naniwadekar said...

> कस्तुरी तिलकं ललाटपटले -> कस्तुरीतिलकं

भुजंगप्रयातात सहाव्या वर्णावर यति असतो? पुढील काही ओळी सहाव्या वर्णावर विश्राम घेऊन म्हणून बघा. भुजंगप्रयात, इन्द्रवज्रा, वंशस्थ इत्यादि छन्दांत यति नाही. या छन्दांत प्रत्येक पदात त्यातल्या शब्दरचनेनुसार विश्रामस्थल निवडले ज़ाते.

छन्दांच्या नांवांना अर्थ असतो, वा अमुक छन्दाचा तमुक भावनेशी सम्बन्ध आहे, या विधानांना काहीही आधार नाही. पण ते एक सोडा. इथे फक्त भुजंगप्रयातातले यति-स्थान (वा त्याचा अभाव) पाहू.

शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं (यतिस्थान, या पदापुरते - सहावा वर्ण)
कलत्रं धनं पुत्रपौत्रादिसर्वं, (सातवा वर्ण)
रतीचे जया रूपलावण्य लाभे (पाचवा वर्ण)
असा बालगन्धर्व आता न होणे (चौथा आणि सातवा)